संस्कारांची चाकं फिरवणारा चालक: ३८ वर्षे अपघातमुक्त सेवेला विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप
संस्कारांची चाकं फिरवणारा चालक: ३८ वर्षे अपघातमुक्त सेवेला विद्यार्थ्यांचा भावपूर्ण निरोप
तळेगाव दाभाडे :सोमाटणे फाटा येथे एक वेगळ्याच उबदार वातावरणात विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. तब्बल ३८ वर्षे अपघातमुक्त सेवा देणारे, हरिभक्त परायण स्कूल बस चालक हनुमंत भागुजी मुऱ्हे यांच्या यांच्या वतीने विविध शाळांतील २८५ विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. सोमाटना फाटा येथील मामा-भाचे हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि स्थानिक मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
आदर्श विद्यामंदिर, जैन इंग्लिश स्कूल, बाल विकास विद्यालय, स्वामी विवेकानंद स्कूल तसेच इंप्रोज इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देत, भावनिक क्षणांची सरमिसळ झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय प्रवासातील अनुभव सांगताना मुऱ्हे काकान विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार संगीता ताई येनपुरे, सोमाटणे गावचे माजी सरपंच राजेश मुऱ्हे, गोपाळे मामा, जय जाधव, स्वाती शेडे आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात संगीता ताई येनपुरे म्हणाल्या, हनुमंत मुऱ्हे हे केवळ चालक नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील संस्कारवाटेचे शिल्पकार आहेत. त्यांच्या बसमध्ये केवळ प्रवास होत नाही, तर संस्कारांची बीजं पेरली जातात.
मुऱ्हे यांच्या बसची एक खास ओळख म्हणजे बस मधे कधीही चित्रपट गाणी वाजवली जात नाहीत. त्याऐवजी भजन, कीर्तन आणि अध्यात्मिक संदेश देणारी गाणी लावली जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे पालकांनीही नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि वेळेचे काटेकोर पालन करणे ही त्यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये ठरली आहेत.
विशेष म्हणजे, त्यांच्या बसमधून प्रवास केलेल्या अनेक माजी विद्यार्थी आज उच्च शिक्षण घेत असून विविध क्षेत्रात यशस्वी झालेले दिसून येतात. हा त्यांच्या सेवाभावाचा आणि संस्कारक्षम दृष्टिकोनाचा जिवंत पुरावा मानला जात आहे.
या निरोप समारंभाने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर उपस्थित सर्वांच्या मनात कृतज्ञतेची भावना जागवली. हनुमंत मुऱ्हे यांच्या सेवेला सलाम करत, संस्कारांचा प्रवास कधीच थांबू नये,असा भावनिक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.





