महानगरपालिकेच्या लोगोतील घोड्याचे हवेतील पाय वादात; इतिहासप्रेमींकडून दुरुस्तीची मागणी
महानगरपालिकेच्या लोगोतील घोड्याचे हवेतील पाय वादात; इतिहासप्रेमींकडून दुरुस्तीची मागणी
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग ठरलेले महापालिकांचे लोगो आता नव्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत चिन्हांमध्ये दर्शविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ लोगो मधील घोड्याच्या पायांची स्थिती इतिहासाशी विसंगत असल्याचा मुद्दा पुढे येत आहे. यामुळे इतिहासप्रेमी नागरिकांनी या लोगोमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
अश्वारूढ पुतळ्यांमधील (लोगो) घोड्याच्या पायांची रचना ही केवळ कलात्मक बाब नसून ती एक प्रकारची मूक ऐतिहासिक भाषा मानली जाते. परंपरेनुसार, घोड्याचे दोन्ही पुढचे पाय हवेत असतील तर त्या योद्ध्याचा मृत्यू रणांगणात वीरमरणाने झाला असे सूचित होते. एक पाय हवेत असल्यास जखमांमुळे मृत्यू, तर चारही पाय जमिनीवर असल्यास नैसर्गिक मृत्यू दर्शविला जातो. या संकेतशास्त्राला अश्वसंकेत परंपरा असेही संबोधले जाते.
मात्र, महापालिकांच्या लोगोमध्ये दाखविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्याचे दोन्ही पाय हवेत असल्याचे दिसते. यावर इतिहास अभ्यासक आणि शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला होता. अशा परिस्थितीत लोगोमधील ही रचना दिशाभूल करणारी आहे, असे मत अनेक इतिहासप्रेमींनी व्यक्त केले.
या संदर्भात सामाजिक माध्यमांवरही लोगो-संशोधन’ मोहिमेला वेग आला आहे. काही नागरिकांनी याला दृश्य-भ्रमातून इतिहासाचा विपर्यास असे संबोधत प्रशासनाला जागे होण्याचे आवाहन केले आहे. लोगो हा केवळ प्रतीक नसून तो जनमानसात इतिहासाची छाप उमटवतो. त्यामुळे त्यातील प्रत्येक तपशील अचूक असणे गरजेचे आहे, असे मत इतिहास अभ्यासकांनी नोंदवले.
दरम्यान, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी वाढत्या दबावामुळे या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी ‘इतिहास-सन्मान, चिन्ह-सुधार या नव्या घोषवाक्यासह आपली भूमिका अधिक ठाम केली आहे.
एकंदरीत, लोगोमधील घोड्याच्या पायांची स्थिती हा केवळ कलात्मक तपशील नसून इतिहासाच्या अचूकतेशी निगडित विषय ठरत आहे. आता प्रशासन या अश्व-चिन्हा तील विसंगती दूर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





