क्राईम

जुना मुंबई–पुणे महामार्गवर अनैतिक देहव्यापाराला ऊत नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी


जुना मुंबई–पुणे महामार्गवर अनैतिक देहव्यापाराला ऊत नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी

तळेगाव दाभाडे : सेंट्रल चौक ते वडगाव फाटा दरम्यानच्या जुना मुंबई–पुणे महामार्गावर गेल्या दोन ते चार वर्षांपासून भरदिवसा अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक, महिला व प्रवासी यांच्यात संतापाची लाट उसळली असून तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार घोरावाडी डोंगर पायथा, सोमाटणे फाटा खिंड, लिंब फाटा तसेच सीआरपीएफ कॅम्प वडगाव फाटा या भागांत दररोज आठ ते दहा महिला उघडपणे रस्त्याच्या कडेला उभ्या राहत असल्याचे दिसून येते. विशेषतः मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा प्रकार अधिक प्रमाणात आढळत असल्याची तक्रार आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा सर्व प्रकार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

महामार्गालगत असलेल्या काही लॉजमध्ये ग्राहकांना घेऊन जाताना महिलांना पाहिल्याचेही स्थानिकांनी सांगितले. सेंट्रल चौक ते वडगाव फाटा या संपूर्ण पट्ट्यात संशयास्पद हालचाली वाढल्याने परिसरातील वातावरण बिघडत आहे. शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थी, कुटुंबियांसह प्रवास करणारे नागरिक आणि कामानिमित्त ये-जा करणाऱ्या महिलांना या परिस्थितीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

भरदिवसा उघडपणे सुरू असलेल्या या प्रकारामुळे आमच्या कुटुंबासमोर लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. अनेकदा अश्लील हावभाव, इशारे यामुळे महिलांची कुचंबना होते. अशी प्रतिक्रिया एका स्थानिक महिलेने व्यक्त केली. सामाजिक संघटनांनीही या प्रकरणात पोलीस प्रशासनाने विशेष पथक नेमून कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित भागात गस्त वाढवून अनैतिक देहव्यापाराला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *