तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेला प्रारंभ: व्यापाऱ्यांना समजपत्र देत जनजागृती
तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून प्लास्टिक बंदी मोहिमेला प्रारंभ: व्यापाऱ्यांना समजपत्र देत जनजागृती
तळेगाव दाभाडे: पर्यावरण संरक्षण आणि शहर स्वच्छतेच्या दृष्टीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे प्लास्टिक बंदी मोहिमेला गुरुवार दि ५मार्च रोजी सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील) तसेच मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने शहरातील व्यापारी व नागरिकांमध्ये प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती करण्यावर भर दिला.
या मोहिमेअंतर्गत तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील गावभागातील मारुती मंदिर चौक परिसरात विशेष जनजागृती करण्यात आली. लिंब फाटा ते मारुती मंदिर चौक या मार्गावरील दुकानदार, व्यापारी, फळ विक्रेते, भाजी विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच फुल विक्रेते यांना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळण्याबाबत समजपत्र देण्यात आले. पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले की, जनजागृतीनंतरही संबंधितांकडे प्लास्टिक पिशव्या आढळल्यास नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी प्लास्टिक वापरास नकार देत कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे, दत्तात्रय ढवळे, शहर समन्वयक शुभम चौकटे तसेच स्वच्छता पर्यवेक्षक राहुल आगळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी व्यापारी आणि नागरिकांना प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
नगर परिषदेकडून राबविण्यात येत असलेली ही मोहीम पुढील काळात शहरातील विविध भागांमध्ये राबविण्यात येणार असून प्लास्टिकमुक्त तळेगाव घडविण्याचा प्रशासनाचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





