तळेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क. हत्तीरोग रुग्णाच्या परिसरात तपासणी मोहीम
तळेगावात आरोग्य यंत्रणा सतर्क. हत्तीरोग रुग्णाच्या परिसरात तपासणी मोहीम
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहरातील भोई आळी परिसरात हत्तीरोगाचा एक रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व आरोग्य यंत्रणा तातडीने सतर्क झाली. या प्रभागाच्या नगरसेविका सौ शोभा सुनिल परदेशी यांनी तात्काळ तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घेतला . त्यानुसार रुग्णाच्या घराभोवतीच्या सुमारे शंभर मीटर परिघातील ८९ नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार संबंधित ५५ वर्षीय रुग्णावर गेल्या वर्षभरापासून डीईसी (DEC) औषधोपचार सुरू आहेत. त्यामुळे या रुग्णामार्फत इतर नागरिकांमध्ये आजाराचा प्रसार होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आजूबाजूच्या नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
ही तपासणी मोहीम तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य निरीक्षक डॉ. दीपक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या उपक्रमात आरोग्य सेवक संदीप थरकुडे, आरोग्य सेविका अनुराधा शिंदे तसेच आशा सेविका राणी चुकाटे, वर्षा बुट्टे, शालिनी रणभरे आणि अश्विनी दाभाडे यांनी सक्रिय सहभाग नोंदवत नागरिकांचे रक्त नमुने संकलित केले.
या संदर्भात माहिती देताना आरोग्य निरीक्षक डॉ. दीपक ढवळे यांनी सांगितले की, हत्तीरोग हा प्रामुख्याने क्यूलेक्स जातीच्या मादी डासांच्या चाव्यामुळे पसरतो. एखाद्या हत्तीरोगग्रस्त व्यक्तीला डास चावल्यास आणि त्यानंतर तोच डास इतर व्यक्तींना चावल्यास संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः रात्री आठ वाजल्यानंतर हे डास अधिक सक्रिय होतात, त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
हत्तीरोगामध्ये हात, पाय, कान अशा शरीराच्या विविध अवयवांना असामान्य सूज येण्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
दरम्यान, तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे, साचलेले पाणी टाळण्याचे आणि डासांची पैदास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामूहिक स्वच्छता आणि जनजागृतीच्या माध्यमातून हत्तीरोगासारख्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
स्थानिक प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या प्रतिबंधात्मक मोहिमेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून संभाव्य आरोग्य धोक्यांवर वेळेत नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.





