सामाजिक

वीर नारोजी देशपांडे समाधीची उपेक्षा: इतिहासाच्या वारशावर दुर्लक्षाचा डाग


वीर नारोजी देशपांडे समाधीची उपेक्षा: इतिहासाच्या वारशावर दुर्लक्षाचा डाग

वडगाव (मावळ) : छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला ऐतिहासिक वारसा असलेली वीर नारोजी बापुजी देशपांडे यांची समाधी आज दुर्लक्षामुळे ओसाड अवस्थेत दिसत असून, या ऐतिहासिक ठेव्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिक व इतिहासप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या या स्थळाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वडगाव येथील हे ठिकाण पूर्वापार घुमटेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते. इतिहास संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, मुघलांविरोधातील लढाईत शौर्याने लढताना वीरगती प्राप्त झालेल्या नारोजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे समाधी उभारली. त्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक व सांस्कृतिक असा दुहेरी मान मिळाला आहे. शिवकालीन इतिहासाशी निगडित असल्याने अनेक इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक आणि शिवप्रेमी या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येथे भेट देत असतात.

इतिहासातील उल्लेखानुसार, सूरत शहरातून परतताना मुघल सैन्याने महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी लुटीची संपत्ती घोड्यांवर असल्याने थेट युद्ध करणे कठीण होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराजांनी नारोजी देशपांडे यांना पुण्यातून दोन हजार सैन्य घेऊन मोगलांना रोखण्याचे आदेश दिले. तळेगाव-वडगाव परिसरात तीन दिवस तुंबळ युद्ध रंगले. या लढाईत नारोजींनी शौर्याने लढा देत वीरमरण पत्करले. राजगडावर पोहोचल्यानंतर ही दु:खद वार्ता समजताच महाराजांनी चार फेब्रुवारी १६६४ रोजी वडगाव येथे येऊन त्यांची समाधी उभारली, अशी माहिती इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी दिली.

या ऐतिहासिक स्थळाला अनेक मान्यवरांनी भेट दिली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे तसेच पुण्यातील देशपांडे कुटुंबीयांनीही या समाधीचे दर्शन घेतले आहे.

मात्र, सध्या समाधी परिसरात साफसफाईचा अभाव, वाढलेली झाडी, तुटलेली संरचना आणि देखभालीअभावी निर्माण झालेली अस्वच्छता असे चित्र दिसत आहे. समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने पर्यटकांना मोठी गैरसोय सहन करावी लागते. तसेच परिसरात माहितीफलक, संरक्षणभिंत आणि मूलभूत सुविधा नसल्याने या वारशाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

इतिहासाची साक्ष देणाऱ्या या समाधिस्थळाचे जतन व संवर्धन करण्यासाठी योग्य रस्ता, नियमित साफसफाई, संरक्षणभिंत आणि माहितीफलक उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. वडगाव नगरपंचायतीने पुढाकार घेऊन या ऐतिहासिक स्मारकाच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडगाव शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *