सामाजिक

मराठी पत्रकार संघाच्या पुढाकारातून पत्रकारांची दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन


मराठी पत्रकार संघाच्या पुढाकारातून पत्रकारांची दिंडी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन

पुणे : पत्रकारितेच्या धकाधकीच्या आणि सततच्या व्यस्त दिनचर्येतून काही क्षण अध्यात्म, संस्कृती आणि वारकरी परंपरेच्या सहवासात घालवण्याची अनोखी संधी मराठी पत्रकार संघाने उपलब्ध करून दिली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांची दिंडी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील पत्रकार बंधू-भगिनींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम बुधवार, ८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पुणे–मुंबई महामार्गावरील निगडी येथील हॉटेल पुणे गेट समोरून दिंडीला प्रारंभ होणार असून सुमारे अर्धा किलोमीटरचे अंतर भक्तिभावाने पार केले जाणार आहे. या दिंडीत सहभागी होणाऱ्या पत्रकारांनी शक्य असल्यास वारकरी परंपरेशी सुसंगत पारंपरिक वेशभूषा परिधान करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दिंडीत सहभागी होणाऱ्यांनी भगवी पताका, टाळ, मृदंग, तुळशी वृंदावन यांसारखे वारकरी परंपरेचे साहित्य सोबत आणल्यास दिंडीचे वातावरण अधिक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. पत्रकारितेचा सामाजिक वसा जपत अध्यात्माची जोड देणारा हा उपक्रम पत्रकारांमध्ये ऐक्य, संवाद आणि सांस्कृतिक जपणुकीची भावना अधिक दृढ करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी राज्यातील सर्व पत्रकारांनी या अनोख्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दिव्य आणि अविस्मरणीय अनुभव घ्यावा, असे आवाहन केले आहे. इच्छुक पत्रकारांनी नाव नोंदणीसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://forms.gle/o7gN5zzLxQCE3xc46
करून सहभाग निश्चित करावा. अधिक माहितीसाठी पुणे जिल्हाध्यक्ष संजय मराठे (मो. ९८५०२०९८५०) यांच्याशी संपर्क साधता येणार असल्याचे संघातर्फे कळविण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *