शहर

तळेगावमधील सलून-पार्लर दरात १ जानेवारीपासून नवीन दर लागू नाभिक संघटनेचा एकमुखी निर्णय


तळेगावमधील सलून-पार्लर दरात १ जानेवारीपासून नवीन दर लागू नाभिक संघटनेचा एकमुखी निर्णय

तळेगाव दाभाडे :
तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व सलून व पार्लरमध्ये येत्या १ जानेवारी २०२६ पासून नवीन दर लागू करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे शहराध्यक्ष ओंकार शिंदे यांनी दिली. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत वीजदर, कामगारांचे वेतन तसेच प्रसाधन साहित्याच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चाचा थेट परिणाम नाभिक व्यावसायिकांवर होत असून, व्यवसाय टिकवणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याने दरवाढ अपरिहार्य ठरल्याचे संघटनेचे अनिरुद्ध चौधरी यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेची विशेष सभा गेल्या आठवड्यात शहराध्यक्ष ओंकार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत दरवाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपापली मते मांडत वाढत्या खर्चाचा आढावा घेतला. अखेरीस सर्वानुमते नवीन दर लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

शहराध्यक्ष ओंकार शिंदे या संदर्भात बोलताना म्हणाले की
नाभिक व्यवसाय हा केवळ सेवा व्यवसाय नसून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. वाढत्या महागाईत दर्जेदार सेवा देण्यासाठी खर्च वाढत आहे. ग्राहकांना चांगली, स्वच्छ व सुरक्षित सेवा देणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे दरवाढ हा निर्णय विचारपूर्वक आणि सर्वानुमते घेण्यात आला आहे. ग्राहकांनी हा निर्णय समजून घेऊन सहकार्य करावे,

या बैठकीस उपाध्यक्ष श्रीमंत ताटे, गणेश जगताप, सौरभ दळवी, निलेश मोरे, खजिनदार किसन आंबेकर, प्रशांत मोरे, मुख्य सल्लागार बापू राऊत तसेच सदस्य चंद्रशेखर शिंदे, परशुराम दळवी, शांताराम गायकवाड, विशाल शिंदे आणि विवेक गायकवाड उपस्थित होते.

तळेगाव शहर नाभिक विकास संघटनेने सर्व नाभिक बांधवांना १ जानेवारी २०२६ पासून नवीन दरपत्रकानुसारच व्यवसाय करण्याचे आवाहन केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *