महत्त्वाचेराजकीय

मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी. ५ फेब्रुवारीला मतदान. ७ फेब्रुवारीला निकाल


मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी. ५ फेब्रुवारीला मतदान. ७ फेब्रुवारीला निकाल

वडगाव मावळ : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले असून, ग्रामीण राजकारण तापू लागले आहे. मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ५ गट व पंचायत समितीचे १० गण अशा एकूण १५ जागांसाठी गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यातील २४३ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, शनिवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत, अशी माहिती मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

राज्य निवडणूक आयोगाने मंगळवार, दि. १३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. या घोषणेमुळे संपूर्ण राज्यात निवडणूक वातावरण निर्माण झाले असून, मावळ तालुक्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामविकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असुन त्याच दिवसापासून वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. १६ ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, मंगळवार, दि. २७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करून निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असून, आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा, महसूल विभाग व निवडणूक कर्मचारी सज्ज झाले आहेत. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, मतदानाच्या दिवशी चोख बंदोबस्त तैनात राहणार आहे.

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. तालुक्यात एकूण २ लाख ३१६ मतदार असून, यामध्ये १,०२,०८२ पुरुष, ९८,२२६ महिला व ८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. वाढती महिला व युवक मतदारसंख्या लक्षात घेता, या निवडणुकीत मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

जिल्हा परिषद गटनिहाय मतदारसंख्या पुढीलप्रमाणे आहे :
टाकवे बुद्रुक – ३९,५४७
इंदुरी – ३६,२८०
खडकाळे – ३९,१०३
कुसगाव बुद्रुक – ३९,६११
सोमाटणे – ४५,७७५
(एकूण मतदार : २,००,३१६)

तर पंचायत समिती गणनिहाय मतदारसंख्या अशी आहे :
टाकवे बुद्रुक – १९,८३९
नाणे – १९,७०८
वराळे – १९,७८१
इंदुरी – १६,४९९
खडकाळे – २०,४२९
कार्ला – १८,६७४
कुसगाव बुद्रुक – १५,४१२
काले – २४,१९९
सोमाटणे – २२,८११
चांदखेड – २२,९६४

पंचायत समिती गणांमधील एकूण मतदारसंख्या देखील २,००,३१६ इतकीच आहे. प्रत्येक गट व गणामध्ये चुरशीची लढत अपेक्षित असून, स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामांची दिशा व नेतृत्वाची विश्वासार्हता यावर मतदारांचा निर्णय अवलंबून राहणार आहे.

या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारही मोठ्या संख्येने रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, गावोगावी बैठका, संपर्क दौरे व प्रचाराची आखणी करण्यात येत आहे. निवडणूक काळात विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक व पारदर्शक कारभाराचे आश्वासन देण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे.

प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी मतदारांना निर्भयपणे व मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. “लोकशाहीचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी प्रशासन सज्ज आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून विकासाभिमुख नेतृत्व निवडावे,” असे त्यांनी सांगितले.

एकूणच मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही आगामी काळातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असून, ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *