तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची माजी राज्यमंत्री संजय भेगडेंशी सखोल चर्चा
तळेगाव शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार
मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांची माजी राज्यमंत्री संजय भेगडेंशी सखोल चर्चा
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी नव्याने रुजू झालेले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी आक्रमक आणि विकासाभिमुख भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या विश्वकमल निवासस्थानी सदिच्छा भेट देत शहरातील विविध नागरी समस्या, प्रलंबित विकासकामे आणि आगामी नियोजनाबाबत सखोल व सकारात्मक चर्चा केली.
या बैठकीत तळेगाव दाभाडे शहरातील विकासकामांना गती देताना येणाऱ्या अडचणी, नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच दीर्घकालीन विकास आराखड्याबाबत विचारमंथन करण्यात आले. शहराच्या धार्मिक, सामाजिक व नागरी गरजांचा समतोल साधत विकास करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
बैठकीत प्रामुख्याने श्री. डोळसनाथ महाराज मंदिराच्या संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पवित्र आणि ऐतिहासिक वास्तूच्या कामात दीर्घकाळापासून होत असलेल्या दिरंगाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. संबंधित ठेकेदाराने येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू न केल्यास कठोर कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकण्याच्या स्पष्ट सूचना मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिल्या. धार्मिक श्रद्धेचा विषय असलेले हे मंदिर वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहरातील मारुती मंदिर चौक, बाजारपेठ परिसर आणि खडक मोहल्ला या भागांतील वाढते अतिक्रमण हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी व अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. या भागात रस्ता रुंदीकरण अत्यंत आवश्यक असून, व्यापारी व स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन टप्प्याटप्प्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी, अशा सूचना देण्यात आल्या. विकासकामे करताना प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय आणि संवाद महत्त्वाचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
तळेगाव दाभाडे शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता, गाव भागातील बनेश्वर स्मशानभूमी अपुरी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नवीन स्मशानभूमी उभारणीचा प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शहराच्या दीर्घकालीन नियोजनासाठी अशा मूलभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस माजी नगरसेवक अरुण भेगडे पाटील, विनोद ऊर्फ बंटी भेगडे तसेच तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





