शहर

मराठा क्रांती चौकातील ‘जनसेवा’ बसथांबा धोक्याच्या सावटाखाली; फ्लेक्सराज आणि रिक्षामक्तेदारीमुळे प्रवाशांचे जीव टांगणीला


मराठा क्रांती चौकातील ‘जनसेवा’ बसथांबा धोक्याच्या सावटाखाली; फ्लेक्सराज आणि रिक्षामक्तेदारीमुळे प्रवाशांचे जीव टांगणीला

 

तळेगाव दाभाडे : तळेगाव चाकण मार्गावरील मराठा क्रांती चौक येथे असलेला जनसेवा बसथांबा सध्या प्रवाशांसाठी अक्षरशः जीवघेणा ठरत असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नमुना ठरत आहे. बसथांब्याच्या परिसरात अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनरचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. हे फ्लेक्स महिनोनमहिने लटकत राहतात, मात्र त्यांची दखल घेण्यास संबंधित यंत्रणा पूर्णपणे उदासीन असल्याचे चित्र दिसून येते.

बसथांब्याचे फलक आणि बस येण्याची दिशा हे फ्लेक्समुळे झाकले जात असल्याने प्रवाशांना बस ओळखणेही कठीण बनले आहे. वाऱ्याच्या झोताने हे मोठे बॅनर कधीही खाली कोसळू शकतात, मात्र एखादी दुर्घटना घडल्याशिवाय प्रशासन जागे होणार नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

विशेष म्हणजे, अवघ्या वीस फूट रुंदीच्या या रस्त्यावर सुमारे दहा फूट जागा फ्लेक्सनी व्यापलेली असून उर्वरित जागा अवैध रिक्षाचालकांच्या मक्तेदारीत अडकली आहे. परिणामी, बसला थांबण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने ती रस्त्याच्या मधोमध थांबते. या वेळी प्रवाशांना धोकादायक पद्धतीने अरुंद जागेतून चढ-उतार करावा लागतो.

याच ठिकाणी यापूर्वी डॉ. साबळे आणि एका परप्रांतीय रंगारीचा( पेंटर) ट्रक अपघातात मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. तरीही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे .

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी हा बसथांबा मुख्य चौकातून सुमारे १०० मीटर पुढे हलवून मराठा क्रांती चौक अपघातमुक्त करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन प्रवाशांच्या सुरक्षेस प्राधान्य देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *