सामाजिक

कान्हे फाटा येथे भंगार व्यवसायाच्या नावाखाली पर्यावरणाची राखरांगोळी झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी, धुरामुळे नागरिक त्रस्त!


कान्हे फाटा येथे भंगार व्यवसायाच्या नावाखाली पर्यावरणाची राखरांगोळी झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी, धुरामुळे नागरिक त्रस्त!

 

कान्हे फाटा(मावळ) :कान्हे परिसरात भंगार व्यवसायाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. भंगार व्यवसायामध्ये जमा होणाऱ्या विविध वस्तूंची झाडाझुडपांमध्येच जाळपोळ केली जात असल्याने परिसरातील हिरवळ, झाडे आणि नैसर्गिक वनस्पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. या जाळपोळीतून निर्माण होणाऱ्या दाट धुरामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

 

भंगार व्यवसायातून जमा होणाऱ्या वस्तूंची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी उघड्यावर जाळण्याचा प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या आगीमुळे केवळ झाडे आणि गवत जळत नाही, तर परिसरातील हवेचे प्रदूषणही वाढत आहे. विशेषतः दाट धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होत आहेत.

 

एकीकडे शासनाकडून वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणासाठी विविध जनजागृती मोहिमा राबवल्या जात असताना दुसरीकडे व्यावसायिक फायद्यासाठी निसर्गाची हानी होत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. भंगार व्यवसाय करण्यास कोणाचाही विरोध नसला, तरी त्या व्यवसायामुळे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात येणे योग्य नाही.

 

या प्रकाराची संबंधित प्रदूषण नियंत्रण विभाग, स्थानिक प्रशासन आणि पोलीस खात्याने गांभीर्याने दखल घ्यावी. घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून जाळपोळ करणाऱ्यांची चौकशी करावी, दोषींवर नियमानुसार कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *