तळेगावात डोळसनाथांच्या साक्षीने कुस्तीचा महाकुंभ; दमदार झुंजींनी आखाडा दणाणला
तळेगावात डोळसनाथांच्या साक्षीने कुस्तीचा महाकुंभ; दमदार झुंजींनी आखाडा दणाणला
तळेगाव दाभाडे : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या वार्षिक उत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भरलेल्या भव्य कुस्ती स्पर्धांनी यंदा अक्षरशः ‘मल्लयुद्धाचा महोत्सव’च रंगवला. परंपरेचा गंध आणि स्पर्धेची झिंग यांचा संगम अनुभवत राज्यभरातील नामांकित पैलवानांनी आखाड्यात दमदार हजेरी लावत तब्बल ६० हून अधिक चुरशीच्या कुस्त्या रंगवल्या. यामुळे परिसरात उत्साहाची लाट उसळली होती.
सायंकाळी पाचच्या सुमारास विधिवत आखाडा पूजनाने या थरारक सोहळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीच्या बालगटातील कुस्त्यांनी प्रेक्षकांना रंगात आणले, तर त्यानंतर अनुभवी मल्लांच्या आगमनाने वातावरण अक्षरशः तापले. हलगीच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात पैलवानांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मानाच्या पहिल्या लढतीत माउली कोकाटे आणि दादा शेळके यांच्यातील झुंज विशेष ठरली. आक्रमक डावपेच आणि चपळ हालचालींच्या जोरावर कोकाटे यांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत मानाची गदा पटकावली. या विजयासोबत त्यांनी अडीच लाख रुपयांचे पारितोषिकही आपल्या नावे केले. दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भरत मदने यांनी गणेश जगताप यांना पराभूत करत एक लाख २१ हजार रुपयांची गदा जिंकली.
तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत बाळू बोडके आणि समीर शेख यांच्यातील सामना उत्कंठावर्धक ठरला. सुरुवातीला पंचांनी बरोबरी जाहीर केली असली, तरी प्रेक्षकांच्या आग्रहाखातर सामना पुढे सुरू ठेवण्यात आला. शेवटी बोडके यांनी एक गुण मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.
इतर लढतींमध्ये भोसरीच्या नाना शिंदे आणि गोडुंब्रेच्या प्रतीक येवले यांच्यातील झुंज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. या चुरशीच्या लढतीत येवले यांनी सरशी साधली. तसेच स्वरूप खोल्लम आणि शिवांश राक्षे यांच्या कुस्तीत ‘झोळी डाव’चा अचूक वापर करत खोल्लम यांनी प्रतिस्पर्ध्याला चितपट केले.
स्थानिक युवा मल्लांनीही आपली ताकद दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. आदित्य भेगडे, श्रीराज भेगडे, श्रीराज काकडे, इंद्रजित जांभुळकर, समस्कारा सरोदे आणि शिवराज सातकर यांच्या कुस्त्यांनी रंगत वाढवली. संपूर्ण स्पर्धेदरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेसाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या सोहळ्यास माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्यासह गणेश भेगडे, बबनराव भेगडे, बाळासाहेब काकडे, रवींद्र दाभाडे, विक्रम काकडे, मिथुन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे सुरळीत आयोजन करण्यात आले. यंदा तब्बल १० लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आल्याने स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
दरम्यान, अभिजित कटके, किरण भागवत, महिपत लांडे आणि द्वारकादास दाभाडे या नामांकित पैलवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पंच म्हणून बाळासाहेब सातकर, बाळा तात्या भेगडे, नारायण भेगडे, संभाजी भेगडे, वैभव भेगडे आणि समीर सरोदे यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख काकडे व सुनील भेगडे यांनी केले, तर प्रा. हांगेश्वर धायगुडे यांनी समालोचन करत उपस्थितांची उत्कंठा कायम ठेवली.





