नगराध्यक्ष संतोष दाभाडे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या पुढाकाराने घंटागाड्यांवर मराठी घोषणांची सुरुवात
नगराध्यक्ष संतोष दाभाडे व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या पुढाकाराने घंटागाड्यांवर मराठी घोषणांची सुरुवात
तळेगाव दाभाडे : शहरातील स्वच्छता व्यवस्थेशी निगडित घंटागाड्यांवर हिंदी घोषणांचा वापर होत असल्यामुळे निर्माण झालेल्या वादाला अखेर सकारात्मक वळण मिळाले आहे. राजभाषेच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या ‘मावळ दर्पण न्युज’ने १० मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची तातडीने दखल घेत नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी स्वच्छता विभागाच्या घंटागाड्यांवरून आता मराठीतून घोषणा देण्याची व्यवस्था केली आहे. माझा कचरा, माझी जबाबदारी यांसारख्या मराठी गीतांद्वारे जनजागृती केली जात असून, या बदलाचे मराठीप्रेमी नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत होत आहे.
यापूर्वी शहरातील विविध भागांत सकाळच्या वेळेस फिरणाऱ्या घंटागाड्यांवर कचरे वाली गाड़ी आई, घर से कचरा निकाल तसेच स्वच्छ भारत का इरादा अशा हिंदी घोषणा वाजवल्या जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. महाराष्ट्रात मराठीला राजभाषेचा दर्जा असताना सार्वजनिक सेवांमध्ये हिंदीचा वापर होणे म्हणजे राजभाषेचा अवमान असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मराठीतूनच घोषणा द्याव्यात, अशी ठाम मागणी केली होती. मावळ दर्पण ने हा मुद्दा लावून धरल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करत मराठीचा सन्मान राखण्याचा निर्णय घेतला.
नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या या निर्णयाबद्दल शहरातील विविध स्तरांतून त्यांचे जाहीर आभार मानले जात आहेत. स्वच्छता दूतांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्यामार्फत मराठी भाषेतून जनजागृती होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या निर्णयामुळे केवळ स्वच्छता मोहिमेला बळ मिळाले नाही, तर मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनालाही हातभार लागला आहे. तळेगाव दाभाडे शहरात आता स्वच्छतेबरोबरच मराठीचा आवाजही घुमू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.





