तळेगावात मोजकीच स्वच्छतागृहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे लक्ष देणार का?
तळेगावात मोजकीच स्वच्छतागृहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे लक्ष देणार का?
तळेगाव दाभाडे :
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले, औद्योगिक आणि शैक्षणिक दृष्ट्या वेगाने विस्तारत असलेले तळेगाव दाभाडे शहर आज एका गंभीर नागरी समस्येने त्रस्त झाले आहे. लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी असून, ही समस्या आता केवळ गैरसोयीपुरती न राहता नागरिकांच्या आरोग्य आणि सन्मानाच्या प्रश्नाशी जोडली गेली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळत आहे.
शहरातील भेगडे तालीम चौक, चावडी चौक, जिजामाता चौक, मारुती मंदिर चौक आणि तळेगाव रेल्वे स्टेशन परिसरात असलेली मोजकीच सार्वजनिक स्वच्छतागृहे ही संपूर्ण शहराची तथाकथित व्यवस्था आहे. मात्र या स्वच्छतागृहांची अवस्था अक्षरशः विदारक आहे. ठिकठिकाणी असह्य दुर्गंधी, पाण्याचा अभाव. अस्वच्छ फरशा आणि देखभालीचा पूर्ण अभाव दिसून येतो. परिणामी महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना, दिव्यांगांना तसेच प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’चे मोठमोठे फलक शहरात झळकत असले तरी प्रत्यक्षात स्वच्छतेचा मागमूसही आढळत नाही, ही बाब अधिक वेदनादायी आहे. कागदोपत्री योजना आणि प्रत्यक्षातील वास्तव यातील दरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
खळदे आळी येथील शासकीय स्वच्छतागृह दिवसाढवळ्या जमीनदोस्त झाल्याची घटना तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. हे स्वच्छतागृह कोणी पाडले, कोणाच्या आदेशाने पाडले, आणि त्यामागील नेमका हेतू काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नगरपरिषद प्रशासनाने या प्रकरणावर बोटचेपी भूमिका घेतल्याने संशयाचे ढग अधिकच गडद होत आहेत.
राजकीय पातळीवरही नागरिकांचा रोष वाढत आहे. काही वर्षांपूर्वी आमदार आणि खासदारांनी शहरात नवी, सुसज्ज सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याची आश्वासने दिली होती. मात्र ही आश्वासने निवडणूक प्रचारापुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जिजामाता चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सार्वजनिक स्वच्छतागृहाला तब्बल दोन वर्षांपासून टाळे लागले असून, व्यापारी, ग्राहक आणि प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील) यांच्या कार्यकाळात तरी या ज्वलंत प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जाणार का, असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. विकासाच्या गगनभेदी घोषणा नकोत, स्मार्ट सिटीच्या फक्त घोषणा नकोत; किमान सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा तरी उपलब्ध करून द्याव्यात, हीच तळेगाव दाभाडेकरांची रास्त आणि ठाम मागणी आहे.





