तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत शासकीय जागेवर अतिक्रमणाचा सुळसुळाट
तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत शासकीय जागेवर अतिक्रमणाचा सुळसुळाट
तळेगाव दाभाडे : शहराच्या वाढत्या नागरी विस्तारासोबत अतिक्रमणाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. तळेगाव-चाकण मार्गावरील मधूबन साई सिटी शेजारील शासकीय जागेवर मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले असून प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सदर जागेवर अनधिकृतपणे झोपड्यांचे जाळे उभे राहत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दिवसा शांत भासणारा हा परिसर रात्री मात्र गोंधळ, वादविवाद आणि संशयास्पद हालचालींनी गजबजून जातो. रात्री उशिरापर्यंत भांडणांचे आवाज येत असल्याने महिलांमध्ये व ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
याशिवाय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून दुर्गंधीने परिसर अक्षरशः त्रस्त झाला आहे. सकाळच्या वेळेस भंगार गोळा करणाऱ्यांची वर्दळ वाढत असून काचेच्या बाटल्यांच्या आवाजाने शांतता भंग होत आहे. काही जण मोठ्या गोण्या भरून काच व इतर भंगार साहित्य येथे रिकामे करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पर्यावरणीय व आरोग्यविषयक धोक्यांची शक्यता नाकारता येत नाही.
शेजारील सोसायट्यांतील रहिवाशांना या सर्व प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांचे आरोग्य, वृद्धांची सुरक्षितता आणि महिलांची भीती या तिन्ही आघाड्यांवर परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
ही जागा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून अतिक्रमण हटवावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेषतः अतिक्रमण विभागाने नियमांनुसार कठोर कारवाई करून हा प्रकार रोखावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर या गंभीर प्रकरणाची दखल घेणार का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यास परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती व्यक्त होत आहे.





