सामाजिक

तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तार: ४२०० कोटींचा विकास, मात्र शतकांतील वृक्षांचा विनाश


तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग विस्तार: ४२०० कोटींचा विकास, मात्र शतकांतील वृक्षांचा विनाश

तळेगाव दाभाडे :
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्ग (NH-548D) या ५३.२ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या मार्गाच्या रुंदीकरणासाठी राज्य सरकारने तब्बल ४,२०० कोटींहून अधिक निधी मंजूर केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत चार-लेन उन्नत मार्गासोबत समांतर सेवा रस्ते उभारण्यात येणार असून, चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या कामासाठी सुमारे चार वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

मात्र, या विकासयोजनेच्या सावलीत पर्यावरणीय प्रश्न अधिकच गडद होताना दिसत आहेत. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर वडगाव फाटा ते चाकण दरम्यान रस्त्याच्या कडेला तसेच दुभाजका मध्ये उभ्या असलेल्या शंभर ते दीडशे वर्षे जुन्या असंख्य वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. या वृक्षांनी केवळ रस्त्याला हिरवाई दिली नव्हती, तर अनेक पक्ष्यांचे निवासस्थान म्हणूनही त्यांचे महत्त्व होते. झाडांच्या या निर्घृण तोडीमुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला असून, पर्यावरणीय संतुलन धोक्यात आले आहे.

या वृक्षांच्या सावलीत प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता उन्हाचा तीव्र सामना करावा लागत आहे. अनेक मोठ्या वृक्षांची नैसर्गिक छाया नाहीशी झाल्याने परिसरातील तापमानातही वाढ झाल्याचे जाणकार सांगतात. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बळी देणे कितपत योग्य आहे? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी या विषयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, या मार्गावरील अनेक झाडे शंभर ते दीडशे वर्षे जुनी आहेत. त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. उर्वरित झाडे तरी वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांचे स्थलांतर (ट्रान्सलोकेशन) करण्याची मागणी पुढे केली आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे शक्य आहे, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती आणि नियोजनाची गरज आहे, असे मत व्यक्त होत आहे.

एकीकडे वाहतुकीसाठी अत्याधुनिक रस्ते उभारले जात असताना, दुसरीकडे नैसर्गिक वारशाचा होत असलेला ऱ्हास चिंतेचा विषय ठरत आहे. आता प्रशासनाने या दोन्ही बाबींमध्ये समतोल राखत उर्वरित झाडांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *