वडगाव पोलिसांची तत्परता; हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन शोधून मालकिणीच्या ताब्यात
वडगाव पोलिसांची तत्परता; हरवलेली २.५ तोळ्यांची सोन्याची चैन शोधून मालकिणीच्या ताब्यात
वडगाव (मावळ) :
पौड येथील रहिवासी परमेश्वर पांडुरंग पवार (वय ३५) यांच्या पत्नीच्या गळ्यातील सुमारे २.५ तोळे वजनाची सोन्याची चैन हरवल्यानंतर वडगाव पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ती अल्पावधीत शोधून काढण्यात यश आले असून सदर चैन मूळ मालकिणीच्या ताब्यात सुखरूप परत करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवार दांपत्य सोमवारी (दि. १६ मार्च) रोजी वडगाव येथे त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. दरम्यान, ते पोटोबा मंदिर परिसरात फिरण्यासाठी गेले असता, त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची चैन नकळतपणे खाली पडून हरवली. काही वेळाने ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली. मात्र बराच वेळ शोधूनही चैन मिळून न आल्याने त्यांनी वडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या फुटेजमध्ये एक केळी विक्रेत्या महिलेच्या गाडीसमोर संबंधित चैन पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच एका महिला ग्राहकाने ती चैन उचलून नेल्याचेही उघड झाले.
या आधारे पोलिसांनी तांत्रिक तसेच पारंपरिक तपास पद्धतींचा वापर करत संशयित महिलेचा शोध सुरू केला. अखेर तिचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. संबंधित महिलेची चौकशी केली असता तिच्याकडून २.५ तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती चैन मूळ मालकिणीला परत करण्यात आली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, सहाय्यक उपनिरीक्षक अजित ननावरे, हवालदार आशिष काळे तसेच पोलीस कर्मचारी पतुरे, ढोले, भांगे, गोरे, राक्षे आणि ढमाले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, या घटनेमुळे वडगाव पोलिसांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले असून नागरिकांकडून त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांनी नागरिकांना मौल्यवान दागिने सांभाळून वापरण्याचे तसेच सार्वजनिक ठिकाणी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





