भारतीय संस्कृतीचा दिमाखदार साज: हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा पेरेंट-किड फॅशन शो ठरला आकर्षण
भारतीय संस्कृतीचा दिमाखदार साज: हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलचा पेरेंट-किड फॅशन शो ठरला आकर्षण
सोमाटणे (मावळ) : प्रतिनिधी
राष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधत सोमाटणे येथील नामांकित हाय व्हिजन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शनिवारी (दि. ११ जुलै) इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसाठी एचव्हीआयएस स्टाईल सिनर्जी २०२६ या अनोख्या फॅशन शोचे रंगतदार आयोजन करण्यात आले. विरासत भारतीय वारसा या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून भारतीय परंपरा, संस्कृती आणि कुटुंबातील भावबंध यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
खादी, सुती, रेशमी आणि हातमागावरील वस्त्रांपासून साकारलेल्या पारंपरिक वेशभूषेत ५० हून अधिक पालकांनी आपल्या चिमुकल्यांसह रॅम्पवर दिमाखदार वावर करत उपस्थितांची मने जिंकली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतच्या विविध राज्यांची सांस्कृतिक विविधता, पैठणीचा नाजूक साज, नऊवारीचा रुबाब आणि धोती-कुर्त्याचा पारंपरिक थाट यामुळे संपूर्ण सभागृह भारतीय संस्कृतीच्या रंगांनी नटले होते.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ‘महाराष्ट्र लाईव्ह मराठी मावळ न्यूज च्या जेष्ठ पत्रकार रेश्मा फडतरे उपस्थित होत्या. शाळेच्या संचालिका राजश्री नाम्बियार, प्राचार्या रम्या राजाबालाकुमार, उपप्राचार्य अप्पासाहेब रूपनर आणि पर्यवेक्षिका रिझवाना शेख यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन विभाग प्रमुख स्मृती पाथरे यांनी केले, तर सूत्रसंचालन अनुराधा शर्मा यांनी प्रभावीपणे पार पाडले. दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या सत्काराने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्या रेश्मा फडतरे यांनी भारतीय हातमाग संस्कृतीची नव्या पिढीला ओळख करून देतानाच पालक-पाल्यांतील नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीसाठी निवडलेल्या ‘टॉप १०’ जोड्यांची निवड करताना परीक्षकांनाही मोठी कसोटी द्यावी लागली. विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अल्पोपहार आणि राष्ट्रगीताने भारतीय संस्कृतीचा गौरव करणाऱ्या या संस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली.





