शाळेजवळील गणेश विसर्जन हौद ठरतोय डेंग्यूचा अड्डा:
शाळेजवळील गणेश विसर्जन हौद ठरतोय डेंग्यूचा अड्डा:
तळेगाव दाभाडे | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे शहरातील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे (पाटील) प्राथमिक शाळेजवळ गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेला हौद सध्या पावसाच्या पाण्याने भरल्याने नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या अगदी जवळ असलेल्या या हौदात साचलेले पाणी डेंग्यू व मलेरियासारख्या आजारांना आमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
हौदाशेजारी फिरते शौचालय आणि बंद अवस्थेतील ट्रॅक्टर उभा असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या ठिकाणापासून अवघ्या ५० फूट अंतरावर शाळेचे मैदान असून येथे दररोज शेकडो विद्यार्थी खेळण्यासाठी येतात. तसेच परिसरात जुनी नगरपरिषद इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि दाट लोकवस्ती असल्याने संभाव्य आरोग्यधोका अधिक गंभीर ठरत आहे.
वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासनाने हौदातील पाणी काढण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीला पोषक ठरत असल्याने पालकांनी मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, हौद तातडीने रिकामा करून तो कोरडा करावा, पावसाळ्यात वॉटरप्रूफ ताडपत्रीने झाकावा तसेच सुरक्षिततेसाठी हौद बंदिस्त करावा, अशी ठाम मागणी नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा संभाव्य अपघात किंवा आरोग्यविषयक संकट उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, असा संतप्त इशाराही नागरिकांनी दिला आहे.





