महाराष्ट्र

महावीर कुस्ती स्पर्धेवर मावळचा ठसा:पै. दीपक दाभाडे प्रथम क्रमांकाचे मानकरी


महावीर कुस्ती स्पर्धेवर मावळचा ठसा:पै. दीपक दाभाडे प्रथम क्रमांकाचे मानकरी

 

तळेगाव दाभाडे : मावळच्या कुस्ती परंपरेचा झेंडा उंचावत श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाचे वारकरी पै. दीपक चंद्रकांत दाभाडे यांनी ‘श्री समर्थ विष्णूदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा-२०२६ मध्ये दमदार कामगिरी करत ४५ ते ५५ वर्षे वयोगटात प्रतिस्पर्ध्याला चितपट करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मावळच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

श्री क्षेत्र आळंदी-देहू पंढरपूर परिसर विकास समिती आणि माईर्स एमआयटी विश्व शांती केंद्र, आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीनिमित्त कुस्तीगीर वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला राज्यभरातील वारकरी मल्लांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंढरपूर आषाढी वारीदरम्यान विश्व शांती गुरुकुल, वाखरी येथे पार पडलेल्या स्पर्धेत पै. दाभाडे यांनी आपल्या ताकद, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर विजेतेपदावर नाव कोरले.

गेल्या १७ वर्षांपासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाच्या स्पर्धेचे मुख्य समन्वयक शिवछत्रपती पुरस्कार विजेते विलास कथुरे होते. महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, विष्णू जोशिलकर, रावसाहेब मगर, महेश वरुटे, राहुल बिराजदार तसेच हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सन्मानचिन्ह, तलवार, मानाचा फेटा आणि रू ७ हजारांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

या यशानंतर श्री क्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाजाच्या पंढरपूर येथील धर्मशाळेत श्री विठ्ठल रखुमाई संत तुकाराम भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद, माजी पंचायत समिती सभापती निवृत्ती शेटे, बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे, पंडित मोकाशी, चंद्रकांत दाभाडे, माणिक भसे आदी मान्यवरांच्या हस्ते पै. दीपक दाभाडे यांचा मावळवासीयांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विशेष म्हणजे, पै. दीपक दाभाडे यांनी यापूर्वीही प्रतिष्ठेची
मावळ केसरी गदा जिंकत आपल्या कुस्ती कौशल्याची छाप पाडली आहे. ते तळेगाव दाभाडे येथील ऑर्डिनन्स डेपोमध्ये कार्यरत असून कुस्तीबरोबरच क्रिकेट आणि इतर विविध क्रीडा प्रकारांतही प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या या यशामुळे मावळच्या क्रीडा परंपरेचा गौरव अधिक उंचावला असून युवा कुस्तीपटूंना प्रेरणादायी आदर्श मिळाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *