विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका.शाळा परिसरातील दंगा-मस्तीवर आळा घालण्याची मागणी
तळेगाव दाभाडे :
येथील थोर समाज सेवक नथुभाऊ भेगडे पाटील माध्यमिक शाळा अॅड पु.वा.पराजपे विद्यालय . आदर्श विद्यामंदिर .तसेच इतर शाळा परिसरात शाळा सुटण्याच्या वेळेत असामाजिक प्रकार वाढत असल्याने पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शाळा सुटल्यानंतर काही विद्यार्थी व शाळाबाह्य अल्पवयीन मुले शाळेच्या आजूबाजूला दंगा, भांडण . शिवीगाळ व मस्ती करत फिरताना दिसून येत आहेत.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यावर काही शाळकरी मुले देखील टोळक्याने रस्त्यावर उभी राहून एकमेकांशी शिवीगाळ, हाणामारी करत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही अल्पवयीन मुले दुचाकी वाहनांवरून शाळेच्या बाहेर ये जा करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. संबंधित मुले शाळेतील विद्यार्थी नसून शाळाबाह्य असल्याची माहिती समोर येत आहे.
शाळा सुटण्याच्या वेळेत ही मुले दुचाकीवरून वेगाने शाळेच्या भोवती फेऱ्या मारत दंगा मस्ती करतात. यामुळे अपघाताचा धोका वाढला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालकांकडून वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
महत्त्वाचे म्हणजे, महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकाची पेट्रोलिंग सर्व शाळांच्या बाहेर नियमितपणे होत नसल्याचे उघड झाले आहे. काही ठरावीक ठिकाणीच पेट्रोलिंग मर्यादित असल्याने असामाजिक घटकांचा वावर वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत शाळा सुटण्याच्या वेळेत पोलीस व दामिनी पथकाचे नियमित पेट्रोलिंग वाढवावे, तसेच अल्पवयीन वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.





