जे.सी.बी. इंडिया कर्मचारी संघटनेत नव्या नेतृत्वाची एंट्री विक्रमी मतदानातून कामगारांनी दाखवला विश्वास
जे.सी.बी. इंडिया कर्मचारी संघटनेत नव्या नेतृत्वाची एंट्री विक्रमी मतदानातून कामगारांनी दाखवला विश्वास
नवलाख उंब्रे (मावळ) : जे.सी.बी. इंडिया लि., तळेगाव येथील कर्मचारी संघटनेची त्रैवार्षिक निवडणूक उत्साह, चुरस आणि विक्रमी मतदानामुळे विशेष चर्चेत राहिली. शनिवारी (दि. १ ऑगस्ट) झालेल्या मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच कंपनी परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. संघटनेच्या एकूण ५२३ सभासदांपैकी तब्बल ५२० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावत ९९.४३ टक्के मतदानाची विक्रमी नोंद केली.
निवडणुकीत विनोद फुले यांनी ३५५ मते मिळवत अव्वल स्थान पटकावले. त्यांच्यासह किरण पाटील (३१४), मोहन कटारे (३०७), सुरेश शिंदे (३०३), अमोल कुडले (३००), संतोष डांगवे (३००), खंडेराव जाधव (२९३), राहुल पिंगळे (२९२), विजय कळसकर (२७४), विनोद बिबवे (२७४) आणि गोपाल जाधव (२७१) हे उमेदवार विजयी झाले.
निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. मिठाई वाटप, घोषणाबाजी आणि जल्लोषात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. समर्थकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कंपनी परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
या निवडणुकीसंदर्भात बोलताना जे.सी.बी. कामगार संघटनेचे दिनेश जोगदंड यांनी सांगितले की, नव्याने निवडून आलेले प्रतिनिधी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देतील. कामगारांचे हित जपणे, संघटनेचा पारदर्शक कारभार राखणे, प्रलंबित प्रश्नांवर प्रभावी पाठपुरावा करणे आणि व्यवस्थापनाशी सकारात्मक व विधायक संवाद ठेवणे, याला प्राधान्य दिले जाईल. सर्व कर्मचारी वर्गाला विश्वासात घेऊन संघटनेचे कामकाज चालविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कंपनीतील कामगारांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले होते. विक्रमी मतदानातून कामगारांनी संघटनेवरील विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.





