राजकीय

मावळच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा भाजप आक्रमक शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, मनुष्यबळ, औषधे, ऑक्सिजन, रक्तसाठा व आपत्कालीन सुविधांची तपासणी करण्याची मागणी


*मावळच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेचे तातडीने ऑडिट करा भाजप आक्रमक*

*शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर, मनुष्यबळ, औषधे, ऑक्सिजन, रक्तसाठा व आपत्कालीन सुविधांची तपासणी करण्याची मागणी*

वडगाव :मावळ तालुक्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेतील सुविधांबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. लोणावळा व कान्हे फाटा येथील शासकीय रुग्णालयांसह तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचे तातडीने सखोल ऑडिट करून त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी भाजपच्या वतीने मावळ तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.

तळेगाव दाभाडे जनरल हॉस्पिटलमध्ये नवजात बालक व मातेच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शासकीय आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता तपासणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळतात का, आपत्कालीन परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टर, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका व अन्य आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे का, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची मागणी करण्यात आली.

कान्हे फाटा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारण्यात आल्या असल्या तरी त्या प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. प्रसूतीदरम्यान गुंतागुंत निर्माण झाल्यास आवश्यक उपचार व आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्याची क्षमता, ऑक्सिजन, रक्तसाठा, औषधे, मॉनिटरिंग उपकरणे आणि जीवनरक्षक सुविधा उपलब्ध आहेत का, याचेही ऑडिट करण्याची मागणी भाजपने केली.

गंभीर रुग्णाला अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज भासल्यास रुग्णवाहिका किती वेळेत उपलब्ध होते, रेफरलचा निर्णय कधी घेण्यात आला आणि प्रत्यक्ष स्थलांतरास किती वेळ लागला, याची सविस्तर नोंद तपासावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मावळच्या नागरिकांना त्यांच्या परिसरातच सुरक्षित, सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. केवळ इमारती उभारून आरोग्य व्यवस्था सक्षम होत नाही; त्यासाठी चोवीस तास सक्षम मनुष्यबळ, औषधे, उपकरणे आणि तत्काळ उपचार व्यवस्था कार्यरत असणे आवश्यक आहे. भविष्यात उपचारातील विलंब किंवा सुविधांच्या अभावामुळे कोणत्याही नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस व वेळबद्ध कार्यवाही करावी, अशी ठाम भूमिका भाजपने मांडली.

या वेळी भाजपा तळेगाव दाभाडे-इंदोरी मंडलाचे अध्यक्ष विनायक गंगाराम भेगडे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष भाऊ हरिभाऊ दाभाडे पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर , माजी उपसभापती शांताराम कदम, संघटन मंत्री महेंद्र रामचंद्र पळसे, सरचिटणीस मनोहर भाऊ भेगडे, हिम्मत भाई पुरोहित, गौरव गुंड, समीर भेगडे, मीनाताई भेगडे, अक्षय मोईकर, अनिलजी वेदपाठक, अमित भागीवंत, दत्तात्रय मखामले, राजेंद्र डांगे, प्रसिद्धीप्रमुख आतिश रावळे, युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ दाभाडे, अतुल दादा भेगडे, अक्षय म्हस्के तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मावळच्या आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर केवळ कागदी अहवाल नको, तर प्रत्यक्ष सुधारणा आणि जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *