पत्रकारांच्या सुरक्षेला संघटनेचा मजबूत आधार; पत्रकारांना विमा संरक्षणाचे कवच! आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम; पत्रकारांच्या हितासाठी संघ एकजुटीने मैदानात
पत्रकारांच्या सुरक्षेला संघटनेचा मजबूत आधार; पत्रकारांना विमा संरक्षणाचे कवच!
आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून मावळ तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम; पत्रकारांच्या हितासाठी संघ एकजुटीने मैदानात
वडगाव मावळ
समाजातील अन्याय, अत्याचार आणि जनतेच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या सुरक्षेला आता संघटनेचा मजबूत आधार मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न मावळ तालुका पत्रकार संघाच्या वतीने आणि आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना विमा संरक्षणाचे कवच देण्यात आले. तळेगाव नगरीचे उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते विमा संरक्षणाचे वाटप करण्यात आले.
पत्रकारिता करताना अनेकदा जीव धोक्यात घालून घटनास्थळी धाव घ्यावी लागते. अपघात, नैसर्गिक आपत्ती, गुन्हेगारी घटनांचे वार्तांकन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर काम करताना पत्रकारांना अनेक जोखमींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कै. राजेंद्र काळोखे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मावळ तालुका पत्रकार संघाचे सल्लागार कै. राजेंद्र काळोखे यांना पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या कार्याची आठवण सदैव राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
पत्रकारांच्या पाठीशी ठोस आधार
यावेळी मनोगत व्यक्त करताना सुधाकर शेळके म्हणाले, पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. समाजातील सामान्य माणसाचा आवाज प्रशासन आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणारा प्रत्येक उपक्रम महत्त्वाचा आहे. आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, भविष्यातही पत्रकारांच्या हितासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल.
ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा म्हणाले, पत्रकार दिवसरात्र कोणत्याही परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतो. मात्र, त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतो. विमा संरक्षणामुळे पत्रकारांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळणार आहे. पत्रकार संघाने केवळ पत्रकारांचे प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या सुरक्षिततेसाठीही पुढाकार घेतला, ही समाधानाची बाब आहे.
संजय पाटील यांनी पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, संघटनेची खरी ताकद ही केवळ पदांमध्ये नसून सदस्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात असते. विमा संरक्षणाचा हा उपक्रम पत्रकारांच्या हितासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. भविष्यातही पत्रकारांच्या कल्याणासाठी असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज आहे.
अमिन खान म्हणाले, पत्रकार समाजासाठी लढतो; मात्र त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेचाही विचार होणे गरजेचे आहे. पत्रकारांना विमा संरक्षण मिळणे ही सुरुवात असून, भविष्यात तालुक्यातील प्रत्येक पात्र पत्रकाराला अशा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संघटनेने प्रयत्न करावेत.
पत्रकारांच्या हितासाठी संघटितपणे काम करण्याचा निर्धार
यावेळी मावळ तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन ठाकर यांनी सांगितले की, मावळ तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटना सातत्याने कार्यरत राहणार आहे. पत्रकारांच्या सुरक्षिततेपासून त्यांच्या विविध हक्कांपर्यंत प्रत्येक विषयावर संघटितपणे आवाज उठविला जाईल. विमा संरक्षण योजना ही त्याच दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.
कार्यक्रमास मावळ तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन ठाकर, ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, अमिन खान, संजय पाटील, कार्याध्यक्ष रेखा भेगडे, सचिव प्रा. महादेव वाघमारे, उपाध्यक्ष प्रा. योगेश घोडके, मनोज गवळी, खजिनदार संतोष थिटे, प्रकल्प प्रमुख गणेश वायकर, दत्तात्रय म्हाळसकर, सुभाष भांडे, सचिन मोरे, गणेश भेगडे यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगेश घोडके यांनी केले, तर आभार तालुकाध्यक्ष सचिन ठाकर यांनी मानले.
पत्रकारांच्या कल्याणासाठी एकजूट, सुरक्षिततेसाठी विमा कवच आणि हक्कांसाठी संघटित लढा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.





