तळेगावकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद
तळेगावकरांनो पाणी जपून वापरा! मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा दिवसभर बंद
तळेगाव दाभाडे:
तळेगाव दाभाडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेतील महत्त्वाच्या विद्युत एक्सप्रेस फिडर तसेच पाइपलाइनच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी (1 सप्टेंबर) शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
सोमाटणे जॅकवेल ते चौराई जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान विद्युत एक्सप्रेस फिडर व पाइपलाइनची आवश्यक देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामासाठी मंगळवारी सकाळी आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या कालावधीत तळेगाव दाभाडे शहरातील संपूर्ण गाव भाग तसेच स्टेशन भागातील वडगाव फाटा ते स्टेशन चौक दरम्यानच्या परिसराचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सोमवारपासूनच आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही कालावधी लागू शकतो. नागरिकांनी गैरसोय लक्षात घेऊन सहकार्य करावे, असे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




