ताज्या घडामोडी

नाणे रेल्वे गेट तीन दिवस बंद.नागरिकांची मोठी गैरसोय


नाणे रेल्वे गेट तीन दिवस बंद.नागरिकांची मोठी गैरसोय

 

कामशेत :

 

 

कामशेत–नाणे परिसरातील ४३ क्रमांकाचे रेल्वे गेट दि. १३जून २०२६ ते १५जुन२०२६असे तीन दिवसांसाठी बंद करण्यात आल्याने नाणे व मावळ तालुक्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्ती व देखभाल कामासाठी हे गेट बंद ठेवण्यात आले असले, तरी पर्यायी मार्गांची पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांचा संताप वाढत आहे.

 

या रेल्वे गेटवरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, एसटी बस, रुग्णवाहिका तसेच शालेय वाहने ये-जा करतात. गेट बंद असल्यामुळे नागरिकांना लांबचा व खराब रस्त्याचा वळसा घ्यावा लागत असून प्रवासाचा वेळ दुपटीने वाढला आहे. विशेषतः कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे.

 

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, रेल्वे गेट बंद करण्याची माहिती आधीच देण्यात आली असली तरी योग्य नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. वाहतूक पोलीस, सूचना फलक किंवा पर्यायी मार्गांची ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक वाहनचालकांना दिशाभूल होऊन अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

या पार्श्वभूमीवर कामशेत–नाणे रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपुलाची मागणी होत असताना केवळ आश्वासनांवरच बोळवण केली जात आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. वारंवार रेल्वे गेट बंद राहणे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका लक्षात घेता उड्डाणपूल अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांचे मत आहे.

 

नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून रेल्वे उड्डाणपुलाचे काम केव्हा सुरू होणार याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *