तळेगाव दाभाडेत पाळीव कुत्र्यांमुळे नागरिक हैराण; नियमभंगावर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडेत पाळीव कुत्र्यांमुळे नागरिक हैराण; नियमभंगावर कारवाईची मागणी
तळेगाव दाभाडे : शहरातील नाना भालेराव कॉलनी, यशवंतनगर तसेच गाव भागातील काही परिसरांत पाळीव कुत्रे फिरवण्याच्या वाढत्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पहाटेच्या वेळेत कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्यामुळे आणि भटक्या कुत्र्यांशी होणाऱ्या झटापटीमुळे ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होत असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
नागरिकांच्या मते, काही कुत्रेमालकांकडून आवश्यक खबरदारी न घेतल्यामुळे कुत्र्यांचे वर्तन अनियंत्रित होत असून ते अचानक उड्या मारणे, गुरगुरणे किंवा आक्रमकपणे वागणे अशा घटना वारंवार घडत आहेत. यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, काही कुत्रेमालकांकडे संबंधित सोसायटीची परवानगी (एनओसी) नसतानाही पाळीव कुत्रे ठेवले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच नगरपरिषदेची अनिवार्य नोंदणी न करता कुत्रे फिरवले जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियम व मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नाना भालेराव कॉलनी परिसरात कुत्र्यांमुळे अस्वच्छतेचे प्रमाणही वाढले असून सार्वजनिक ठिकाणी घाण केल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय काही कुत्रेमालकांकडून नागरिकांशी उद्धटपणे वागणे, तक्रार करायची असेल तर करा अशा प्रकारची भाषा वापरणे, असे प्रकारही निदर्शनास आले आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पाळीव कुत्र्यांची अनिवार्य नोंदणी, नियमांचे काटेकोर पालन, सार्वजनिक ठिकाणी कुत्रे फिरवण्यासाठी स्पष्ट धोरण, तसेच अस्वच्छता करणाऱ्या मालकांवर दंडात्मक कारवाई अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
- नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची मागणी आहे.





