तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला अखेर मुहूर्त; औद्योगिक पट्ट्याचा श्वास मोकळा होणार
तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाला अखेर मुहूर्त; औद्योगिक पट्ट्याचा श्वास मोकळा होणार
तळेगाव दाभाडे :
तळेगाव-चाकण-शिक्रापूर या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाच्या कामाला अखेर मुहूर्त लागला असून, अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. तब्बल ५४ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) मंगळवारी (दि. ३० डिसेंबर २०२५) निविदा प्रक्रिया पूर्ण केली. सुमारे ३१०० कोटी रुपये खर्चाच्या या भव्य प्रकल्पासाठी चार कंपन्यांनी स्पर्धात्मक निविदा सादर केल्या होत्या. त्यातील एका कंपनीला काम देण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
तळेगाव, चाकण आणि शिक्रापूर हा पट्टा राज्याच्या औद्योगिक नकाशावर कणा मानला जातो. तळेगाव व चाकण एमआयडीसी, तसेच रांजणगाव औद्योगिक क्षेत्रामुळे या महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतच गेली. अवजड कंटेनर, मालवाहू ट्रक, खासगी वाहने आणि कामगारांची दैनंदिन ये-जा यामुळे हा मार्ग कायमच गजबजलेला असतो. मात्र, अरुंद रस्ता, खड्ड्यांचे साम्राज्य, अपुऱ्या सेवा रस्ते आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा महामार्ग अपघातांचा सापळा ठरला होता. अनेक निष्पाप कामगारांनी या रस्त्यावर आपला जीव गमावला, तरीही प्रशासनाची चाके वर्षानुवर्षे जागेवरच फिरत होती.
या महामार्गाचा प्रश्न राजकीय वर्तुळातही अनेकदा गाजला. नागरिकांच्या आंदोलनांनंतर, उद्योग संघटनांच्या मागणीनंतर आणि वाढत्या अपघातांमुळे अखेर हा महामार्ग एमएसआयडीसीकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतरच या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे हा रस्ता होता; मात्र निधी आणि निर्णयांच्या अभावामुळे काम रखडले होते.
नवीन महामार्ग ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर विकसित केला जाणार आहे. आधुनिक दर्जाचा रुंद रस्ता, सेवा मार्ग, उड्डाणपूल, सुरक्षित वाहतूक व्यवस्था आणि आधुनिक पायाभूत सुविधा या प्रकल्पात असणार आहेत. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर केवळ वाहतूकच सुलभ होणार नाही, तर औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि संपूर्ण परिसराच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा विकासमार्ग खुला होत असल्याने तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील नागरिक, कामगार आणि उद्योजकांमध्ये आशेचे वातावरण पसरले आहे.





