महत्त्वाचे

राजमाचीच्या अंधाराला अखेर पूर्णविराम आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम आदिवासी भागात वीजपुरवठा मंजुर


राजमाचीच्या अंधाराला अखेर पूर्णविराम

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम आदिवासी भागात वीजपुरवठा मंजूर

लोणावळा :
मावळ तालुक्यातील लोणावळा शहरालगत असलेल्या निसर्गरम्य राजमाची गावासह वनहाटी वस्ती, उधेवाडी व फणसराई या दुर्गम व आदिवासी भागांत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वीजपुरवठा होणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विकासाभिमुख भूमिकेमुळे हा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

आजवर या भागांमध्ये वीज सुविधा नसल्याने नागरिकांना अंधारातच दैनंदिन जीवन कंठावे लागत होते. शिक्षण, आरोग्यसेवा, संपर्क व्यवस्था तसेच आधुनिक साधनांपासून हा परिसर दूर राहिला होता. आता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागांतर्गत ४ कोटी ६४ लाख रुपयांच्या वीजपुरवठा प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने या गावांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

डोंगराळ आणि अतिदुर्गम भाग असल्यामुळे या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणे आव्हानात्मक होते. मात्र आमदार सुनील शेळके यांनी या भागातील नागरिकांच्या अडचणी गांभीर्याने घेत सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. विशेषतः पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने आवश्यक निधी मंजूर झाला आहे. यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.

वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर राजमाची परिसरातील घराघरात उजेड पोहोचणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, आरोग्यसेवांमध्ये सुधारणा होईल, लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील, तसेच पर्यटन व्यवसायालाही चालना मिळणार आहे. अनेक पिढ्यांपासून अंधारात जीवन जगणाऱ्या नागरिकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात आमदार सुनील शेळके यांच्या कन्या श्रद्धा शेळके यांनी येथील नागरिकांना दिलेले आश्वासन आता प्रत्यक्षात साकार होत आहे. वीजपुरवठा होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा त्यांनी व्यक्त केलेला निर्धार पूर्ण होत असल्याने स्थानिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे.

या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच आदिवासी विकास विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांमुळे राजमाची परिसर अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करत असून, हा निर्णय येथील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *