प्रभागात समस्या, नगरसेवक मात्र अनभिज्ञ! नावापुरते प्रतिनिधित्व’ की जनतेची फसवणूक?
प्रभागात समस्या, नगरसेवक मात्र अनभिज्ञ! नावापुरते प्रतिनिधित्व’ की जनतेची फसवणूक?
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहराच्या काही प्रभागांमध्ये नागरी समस्यांचा डोंगर वाढत असताना काही नगरसेवक मात्र या वास्तवापासून पूर्णपणे दूर असल्याचे चित्र समोर येत आहे. रस्त्यांवरील खड्डे, पाणीपुरवठ्याची अनियमितता, कचरा व्यवस्थापनातील ढिसाळपणा, गटारांची दयनीय अवस्था .आरोग्य विषय .अशा अनेक प्रश्नांनी नागरिक त्रस्त असताना काही लोकप्रतिनिधींना आपल्या प्रभागात नेमक्या कोणत्या समस्या आहेत याची साधी माहितीही नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक पातळीवर जनतेशी सातत्याने संवाद साधणे, समस्या ऐकून घेणे आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे ही नगरसेवकांची मूलभूत जबाबदारी मानली जाते. मात्र तळेगावातील काही प्रभागांमध्ये जनसंवाद हा शब्द केवळ कागदोपत्रीच उरला असल्याचे चित्र दिसते. अनेक नागरिकांच्या मते, काही नगरसेवक निवडणुकीच्या काळातच प्रभागात दिसतात; त्यानंतर त्यांचा जनतेशी संपर्क जवळपास तुटलेलाच असतो.
प्रभागातील नागरिक सांगतात की, समस्या मांडण्यासाठी नगरसेवकांना भेटणेही कठीण होते. फोनवर संपर्क होत नाही, आणि प्रत्यक्ष भेट झाली तरी समस्यांवर ठोस उत्तर मिळत नाही. त्यामुळे नगरसेवक की केवळ नामधारी प्रतिनिधी? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, लोकप्रतिनिधी पद हे केवळ नावापुढे लावायचे बिरूद नाही. ते जबाबदारीचे पद आहे. या पदाचा उपयोग प्रभागाचा विकास करण्यासाठी व्हायला हवा. मात्र काही जणांकडून या पदाकडे प्रतिष्ठेचा टॅग म्हणून पाहिले जात असल्याची खंत व्यक्त होत आहे.
शहरातील जाणकार नागरिकांचे मत आहे की, जर नगरसेवकांनी नियमित प्रभाग भेटी, नागरिकांशी खुला संवाद आणि समस्यांवर तत्पर पाठपुरावा केला तर अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. परंतु संवादाचा अभाव आणि दुर्लक्षाची वृत्ती यामुळे जनतेमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे.
तळेगाव दाभाडे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी केवळ पदाचा मान न राखता जबाबदारीही पार पाडणे आवश्यक आहे. अन्यथा नगरसेवक पदाचा मान पण प्रभागाशी तुटलेला संवाद ही टीका अधिक तीव्र होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.





