मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार जाहीर
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्व उमेदवार जाहीर
तळेगाव दाभाडे :
मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली निवडणूक तयारी जोरात सुरू करत सोमवारी सायंकाळी सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व गट व गणांतील उमेदवार जाहीर करण्यात आल्याने मावळच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. या घोषणेमुळे निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सोमवार, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता मावळ तालुकाध्यक्ष गणेश वसंतराव खांडगे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, गणेश आप्पा ढोरे, विठ्ठलराव शिंदे रामनाथ वारंगे, किशोर सातकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्यात विकास, विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहे. “पक्षाने जाहीर केलेली उमेदवारांची यादी ही सर्वसामान्य कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी आणि नव्या नेतृत्वाला संधी देणारी आहे. गावागावातील प्रश्न, पाणी, रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हेच आमचे प्रमुख मुद्दे असतील. मावळचा सर्वांगीण विकास हाच आमचा अजेंडा आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
जिल्हा परिषदेसाठी टाकवे बुद्रुक–नाणे गटातून अनंता हनुमंत पावसे, वराळे–इंदोरी गटातून पल्लवी दाभाडे, खडकाळे–कार्ला गटातून दिपाली हुलावळे, कुसगाव बुद्रुक–काले गटातून संतोष गबळु राऊत, तर सोमाटणे–चांदखेड गटातून मनीषा मुर्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महिलांचा सहभाग लक्षणीय असून अनुभवी व नव्या चेहऱ्यांचा समतोल साधण्यात आल्याचे दिसून येते.
पंचायत समितीसाठी टाकवे बुद्रुक गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड, नाणे गणातून आशा ज्ञानेश्वर मोरमारे, इंदोरी गणातून दिलीप नामदेव ढोरे, कार्ला गणातून रेशमा राजू देवकर, कुसगाव बुद्रुक गणातून योगेश मुरलीधर लोहार, काले गणातून शिला रामचंद्र कालेकर, सोमाटणे गणातून साहेबराव कारके, चांदखेड गणातून सुनिता मनोज येवले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खडकाळे गणातून राष्ट्रवादी काँग्रेस–आरपीआय युतीकडून समीर खंडू जाधव, तर वराळे गटातून अतुल मराठे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विकासाची हमी आहे. ही निवडणूक केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आहे.” उमेदवार जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मावळच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
आगामी निवडणुकीत मावळ तालुक्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसची ही उमेदवार घोषणा निवडणुकीतील चुरस आणखी वाढवणारी ठरणार आहे.





