सार्वजनिक व्यायामशाळेसाठी नव्या जिम मशिनरीची मागणी नगरसेवक सागर निर्गुणराव बोडके व नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे यांचे निवेदन
सार्वजनिक व्यायामशाळेसाठी नव्या जिम मशिनरीची मागणी
नगरसेवक सागर निर्गुणराव बोडके व नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे यांचे निवेदन
तळेगाव दाभाडे : शहरातील नागरिकांच्या आरोग्यसंवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक व्यायामशाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथील तुकाराम नगर, गजानन महाराज मंदिर परिसरात नगरपरिषदेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक व्यायामशाळेसाठी नवीन व अद्ययावत जिम मशिनरी उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. नगरसेवक सागर निर्गुणराव बोडके व नगरसेविका सुरेखा निलेश भेगडे यांनी संयुक्तपणे निवेदन सादर करून ही मागणी लावून धरली आहे.
सदर व्यायामशाळा ही परिसरातील तरुणाई, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यचळवळीचे केंद्र ठरली आहे. दररोज शेकडो नागरिक येथे नियमित व्यायामासाठी येत असून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यालाही या व्यायामशाळेचा मोठा हातभार लागत आहे. मात्र सध्या उपलब्ध असलेली बहुतांश जिम मशिनरी ही कालबाह्य, झिजलेली व काही ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या निकामी अवस्थेत असल्याने व्यायाम करताना दुखापतीचा धोका निर्माण झाला आहे.
वाढती सदस्यसंख्या आणि बदलत्या फिटनेस संकल्पनांमुळे सध्याची साधनसामग्री अपुरी पडत आहे. विशेषतः कार्डिओ प्रशिक्षण, स्नायू बळकटीकरण व संतुलित व्यायामासाठी आवश्यक असलेली आधुनिक यंत्रणा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मर्यादित साधनांवरच अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी काही नागरिक खासगी व्यायामशाळांकडे वळताना दिसत असून सार्वजनिक सुविधांचा अपेक्षित वापर कमी होण्याची शक्यता आहे.
आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार व्हावा, तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून व्यायामाची गोडी लागावी आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, सुलभ व दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी ट्रेडमिल, क्रॉस ट्रेनर, हाय-वेट पुलडाउन, लेग प्रेस, चेस्ट प्रेस, मल्टी-जिम यांसारखी आधुनिक जिम मशिनरी बसविण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या माध्यमातून ‘आरोग्यसंपन्न समाज’ घडविण्याच्या दिशेने नगरपरिषदेने ठोस पावले उचलावीत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरपरिषदेने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर नवीन जिम मशिनरीस मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सार्वजनिक व्यायामशाळा ही केवळ व्यायामाची जागा नसून ती सामाजिक आरोग्यसंस्कृतीची शाळा असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक व्यायामशाळा ही सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची शिदोरी आहे. जुनी व निकामी मशिनरी बदलून आधुनिक साधने उपलब्ध झाल्यास तरुणाईला व्यायामाची प्रेरणा मिळेल. सुरक्षित व दर्जेदार सुविधा देणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असून त्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. असे नगरसेवक सागर बोडके.नगरसेविका सुरेखा भेगडे यांनी सांगितले





