नगरपरिषद शाळेत स्काऊट-गाईड मेळावा उत्साहात संपन्न
नगरपरिषद शाळेत स्काऊट-गाईड मेळावा उत्साहात संपन्न
तळेगाव दाभाडे : Lord Baden-Powell व Lady Baden-Powell यांच्या जयंतीनिमित्त (चिंतन दिन) सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्र. ४ व गणेश विद्यामंदिर प्राथमिक शाळा क्र. ७ यांच्या संयुक्त विद्यमाने कब-बुलबुल तसेच स्काऊट-गाईड मेळावा दि. २४ फेब्रुवारी रोजी शाळा क्र. ७, ठाकरवाडी गणपती माळ येथे उत्साहात संपन्न झाला.
मेळाव्यात ६० कब, ६० बुलबुल, ६० स्काऊट व ७० गाईड अशा एकूण २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सकाळी १० वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगरपरिषद शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी . श्रीमती अनिता वैद्य, नगरसेविका शोभाताई परदेशी .नगरसेविका सोनालीताई दरेकर यांच्या हस्ते उद्घाटन व ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे(पाटील) अध्यक्षस्थानी होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, स्वावलंबन व देशसेवेचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले व मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) तथा प्रशिक्षण समुपदेशक विजयकुमार जोरी, जेष्ठ पत्रकार आमिन खान पत्रकार सुरेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याध्यापक केशव चिमटे, मुख्याध्यापिका अनिता तिकोने, संध्या कुलकर्णी, शिक्षण विभागाचे कार्यालयीन प्रमुख मयुरेश मुळे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत मानवंदना, संचलन, वृक्षारोपण, संगीत कवायत, मनोरे, विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रथमोपचार प्रात्यक्षिक आदी उपक्रम घेण्यात आले. शेकोटीच्या कार्यक्रमाने मेळाव्याची सांगता झाली.
स्काऊट-गाईड मार्गदर्शक राजेंद्र शिंदे, पूजा सपकाळे, धनश्री चौधरी, प्राची लोमटे, अनिता सोमवंशी, विष्णू महाजन, रेखा विधाते व सागर साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ताहेरा बासडे, सोनाली घाटे, गणेश ठाकरे, वैशाली साबळे व धीरज भालेराव यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. सौ. निकिता शितोळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राजेंद्र शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मेळावा यशस्वी ठरला.





