सामाजिक

सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांचा आषाढी वारीत सेवाभावाचा आदर्श


सामाजिक कार्यकर्ते राजू शिंदे यांचा आषाढी वारीत सेवाभावाचा आदर्श

 

तळेगाव दाभाडे :आषाढी वारी म्हणजे भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अनोखा संगम. या पवित्र परंपरेत तळेगाव दाभाडे शहरातील सामाजिक कार्यकर्ते राजू शंकरराव शिंदे यांनी यंदाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढाकार घेत सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांच्या कृपाप्रसादाने तळेगाव दाभाडे-माळवाडी दिंडी समाजाच्या वतीने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी पालखी सोहळ्यात सहभागी होत दिंडी क्रमांक १५४ रथामागे आळंदी ते पंढरपूर या प्रवासादरम्यान पाणी वाटप सेवा राबविण्यात येत आहे.

कै. कृष्णराव जगनाडे यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही सेवा कै. इंदुबाई शंकर शिंदे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आली असून, वारकऱ्यांना अखंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा संकल्प यामागे आहे. आषाढी वारीच्या प्रवासात उन्हाचा आणि थकव्याचा सामना करणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरत आहे.

ज्येष्ठ कृष्ण अष्टमी, बुधवार (दि. ८ जुलै) पासून सुरू झालेला हा पालखी सोहळा आषाढ शुद्ध द्वादशी, रविवार (दि. २६ जुलै) रोजी पंढरपूर येथे समाप्त होणार आहे. माझे जिग्रीची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी; पांडुरंगी मन रंगते या अभंगाच्या भावनेतून भक्ती आणि सेवेला समान महत्त्व देत राजू शिंदे यांनी वारकरी संप्रदायातील सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक दृढ केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *