सामाजिक

तळेगाव दाभाडेतील रविवारी भाजी मंडईचा प्रश्न बजेटमधून बेपत्ता.नागरिकांची तीव्र खंत


तळेगाव दाभाडेतील रविवारी भाजी मंडईचा प्रश्न बजेटमधून बेपत्ता.नागरिकांची तीव्र खंत

तळेगाव दाभाडे, शहराच्या मध्यवर्ती भागात दर रविवारी भरणाऱ्या भाजी मंडईमुळे निर्माण होणारा वाहतूक विस्कळीतपणा, गर्दीगोंधळ आणि आपत्कालीन सेवांना भेडसावणाऱ्या अडचणी हा विषय सर्वश्रुत असतानाही तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या नव्याने सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या ज्वलंत प्रश्नाची ठोस दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर रविवारी भाजी मंडई अनियोजित विस्तारकेंद्र ठरत असल्याचे चित्र आहे. मुख्य रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या हातगाड्या, दुचाकी-चारचाकींची बेछूट पार्किंग, तसेच पादचारी मार्गांवरील अतिक्रमणे यामुळे वाहतूक कोंडीचा रविवारचा शिरस्ता बनला आहे. परिणामी रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा अन्य आपत्कालीन सेवांना मार्ग काढताना विलंब सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत.

नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील हालअपेष्टा, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आणि व्यापाऱ्यांनाही भेडसावणारी अस्थिर व्यवस्था या सर्वांचा सर्वंकष विचार करून स्वतंत्र, नियोजित आणि शिस्तबद्ध भाजी मंडईसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद अपेक्षित होती. बाजारासाठी कायमस्वरूपी जागा निश्चित करणे, सुयोग्य वाहतूक आराखडा, पुरेशी पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत बाबींचा समावेश होणे गरजेचे होते. मात्र सादर बजेटमध्ये या संदर्भातील ठोस योजना किंवा आर्थिक तरतूद दिसून न आल्याने नागरिककेंद्री नियोजन हा शब्द केवळ कागदोपत्रीच राहिल्याची टीका होत आहे.

रविवारी भाजी मंडईसाठी कायमस्वरूपी पर्याय उभारण्याची मागणी करण्यात येत आहे शहराच्या सुव्यवस्थेसाठी बाजारशिस्त आराखडा तातडीने अमलात आणावा,

शहरविकासाच्या घोषणांबरोबरच प्रत्यक्ष अंमलबजावणीची पावले उचलली गेली, तरच तळेगाव दाभाडेकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *