लोनावळा हादरला.एक रूपया वरून पेट्रोल पंपावर थरारक हल्ला.
लोनावळा हादरला.एक रूपया वरून पेट्रोल पंपावर थरारक हल्ला.
लोणावळा:
शहरातील तुंगार्ली परिसरात गुरुवारी दुपारी क्षुल्लक कारणावरून उफाळलेल्या संतापाने गंभीर रूप धारण करत पेट्रोल पंपावर हिंसाचार घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ एक रुपया परत देण्याच्या वादातून संतप्त झालेल्या ग्राहकांनी पुन्हा जमाव गोळा करून पेट्रोल पंपावर धडक दिली आणि कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एलआयसी इमारतीलगत असलेल्या देवेंद्र ऑटोलाईन भारत पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. त्या वेळी पेट्रोल पंप कर्मचारी नरेश बाळू गायकवाड (वय ३३, रा. कार्ला, ता. मावळ) आणि त्यांचे सहकारी उमेश महाप्रसाद मिश्रा (वय ४३) हे आपल्या नियमित कामात व्यस्त होते. याच दरम्यान काही ग्राहक पेट्रोल भरण्यासाठी आले असता, किरकोळ पैशांच्या देयकावरून वाद निर्माण झाला.
एक रुपया परत देण्याच्या मुद्द्यावरून झालेला हा वाद सुरुवातीला तोंडी चकमकीपुरता मर्यादित होता. मात्र, वादानंतर साधारण अर्ध्या तासाने संबंधित ग्राहकांनी पुन्हा मोठा जमाव गोळा करून पेट्रोल पंपावर पुनरागमन केले. या वेळी परिस्थिती पूर्णतः हाताबाहेर गेली.
संतप्त जमावाने पेट्रोल पंपात घुसताच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमदाटी सुरू केली. त्यानंतर अचानक लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लोखंडी रॉडचा वापर करून दोन्ही कर्मचाऱ्यांना गंभीर जखमी केले. इतक्यावरच न थांबता, जमावाने पेट्रोल पंपाच्या कार्यालयाच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी जखमी कर्मचारी नरेश गायकवाड यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे फिरवली आहेत. पेण कोळीवाडा (जि. रायगड) येथील अनंत विठ्ठल कोळी, प्रसाद संभाजी कोळी, हर्ष रवींद्र मेहेर, राज मच्छिंद्र कोळी, मच्छिंद्र विठ्ठल कोळी, वेदिका वसंत कोळी, विनंती प्रवीण मोकल तसेच अन्य ४ ते ५ अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपींनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून हल्ला केल्यामुळे गंभीर कलमे लावण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोपडे करत आहेत.
दरम्यान, अत्यंत किरकोळ कारणावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सामाजिक संयमाचा अभाव आणि वाढती आक्रमकता यामुळे अशा घटना घडत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.





