नवलाख उंब्रेत कुस्तीचा नवा अध्याय; राहुल सातकर ठरला मावळ केसरी, महिला केसरी अनुष्का दहिभाते .तर कुमार केसरी ओंकार भोते
नवलाख उंब्रे: मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ ने मावळच्या क्रीडा इतिहासात मानाचा ठसा उमटवला. प्रशांत दादा भागवत युवा मंच व मेघाताई भागवत यांच्या विद्यमाने पार पडलेली ही स्पर्धा अत्यंत भव्य, दिमाखदार आणि शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने आयोजित या स्पर्धेत तब्बल १२५ नामवंत कुस्तीगिरांनी सहभाग घेतला होता.
पुरुष गटात पै. राहुल सत्यवान सातकर (कान्हे) याने आपल्या ताकदवान आणि तांत्रिक खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत मावळ केसरी किताब पटकावला. विजेत्या राहुल सातकरचा आयोजकांच्या वतीने बुलेट मोटरसायकल, मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. महिलांच्या गटात पै. अनुष्का शाहिदास दहिभाते (बेडसे) हिने आत्मविश्वासपूर्ण खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत महिला मावळ केसरीचा मान मिळवला. तिला स्कूटर, मानचिन्ह व रोख बक्षीस प्रदान करण्यात आले. कुमार गटात पै. ओंकार शामराव भोते (परंदवडी) याने अंतिम फेरीत दमदार विजय मिळवत कुमार केसरी किताबासह हिरो होंडा मोटरसायकलचा मान पटकावला.
या स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मावळ तालुक्यात प्रथमच महिलांना मावळ केसरी स्पर्धेत सन्मानाचे व स्वतंत्र स्थान देण्यात आले. मावळ केसरी किताबाच्या विजेत्याला स्व. सचिन शेळके यांच्या स्मरणार्थ सुनील शेळके यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी आमदार सुनील शेळके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय भाऊ चौधरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. विलास कथुरे, तालुका अध्यक्ष गणेश शेठ खांडगे व महिला अध्यक्ष सुवर्णाताई राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुरस्कार वितरण सोहळ्यात पै. मारुती आण्णा वाघुजी आडकर यांना जीवनगौरव पुरस्कार, पै. चंद्रकांत नाना दाभाडे यांना मावळभूषण पुरस्कार तर पै. भरत दशरथ लिम्हण यांना मावळ कुस्ती महर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमास तळेगाव दाभाडे नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांचीही उपस्थिती होती. नवलाख उंब्रे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आयोजन अधिक भव्य ठरले. पैलवानांसाठी सुसज्ज व्यवस्था, स्वच्छ भोजन व ड्रायफ्रूट किट वाटप यामुळे स्पर्धेची सर्वत्र प्रशंसा झाली. कुस्तीच्या माध्यमातून शक्ती, शिस्त आणि संस्कार यांचा संदेश देणारी ही स्पर्धा मावळच्या क्रीडा परंपरेसाठी नवा मानदंड ठरली आहे.





