गडकोटांचा सन्मान राखा. नववर्ष स्वागतासाठी मावळात कठोर नियमांची मागणी
वडगांव मावळ :
३१ डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ऐतिहासिक गडकिल्ले व लेणी यांच्या पावित्र्याला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था, वडगांव मावळ यांच्यावतीने वन विभागाकडे कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात मा. वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगांव मावळ यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यातील तिकोना, तुंग, लोहगड, विसापूर, मोरगिरी हे ऐतिहासिक गडकिल्ले तसेच परिसरातील प्राचीन लेणी ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी ठिकाणे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या वास्तूंना पाहण्यासाठी वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून ३१ डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी होणाऱ्या बेजबाबदार कृत्यांमुळे ऐतिहासिक वारसास्थळांचे पावित्र्य धोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नववर्षाचे स्वागत करताना काही पर्यटक मद्यपान, धूम्रपान तसेच अमली पदार्थांचा वापर करीत मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावून गोंधळ घालतात. यामुळे परिसरातील शांतता भंग पावतेच, शिवाय गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक महत्त्वही डागाळले जाते. शिवकालीन इतिहासाशी नाते सांगणाऱ्या या पवित्र वास्तूंवर अशा प्रकारची हुल्लडबाजी ही शिवभक्तांच्या भावना दुखावणारी असल्याची भावना दुर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
पूर्वीच्या अनुभवांवरून ३१ डिसेंबरच्या रात्री काही पर्यटक गड, लेणी व जंगल परिसराचा गैरवापर करतात. कचरा टाकणे, मद्याच्या बाटल्या फेकणे, तसेच आग लावण्याचे प्रकार यामुळे पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर, गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेने वन विभाग व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ३१ डिसेंबर रोजी व त्याआधी काही दिवस संबंधित गड व लेणी परिसरात जाण्या-येण्यावर निर्बंध घालणे, रात्री मुक्कामास मनाई करणे, तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
मावळातील ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहावा, गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपले जावे आणि नववर्ष स्वागत सुसंस्कृत व शिस्तबद्ध पद्धतीने व्हावे, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व दुर्गप्रेमींमधून व्यक्त होत आहे.





