क्राईम

स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवडचा कचरा तळेगावात


स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवडचा कचरा तळेगावात

 

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे शहरात पिंपरी-चिंचवड परिसरातील कचरा अनधिकृतपणे आणून टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास कचऱ्याने भरलेले तीन ट्रक स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा तळेगावच्या कचरा डेपोत टाकला जात असल्याचा गंभीर आरोप समोर येत असून या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मोरखळा येथील कचरा डेपो परिसरात रात्री तीन ट्रक संशयास्पदरीत्या दाखल झाले होते. परिसरातील हालचाली संशयास्पद वाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुहास गरुड .योगेश गरूड .मनोज आगळे यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रक अडवले. ट्रक ची तपासणी केली असता तिन्ही ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असल्याचे उघड झाले. हा कचरा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून आणण्यात आल्याची माहिती ट्रक सोबत आलेल्या तेरा कामगारांनी दिली.

दरम्यान, ट्रक अडवण्यात आल्यानंतर काही वेळातच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या जवळील पाच कार्यकर्ते तसेच एका महिला नगरसेविकेने घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती घटणा स्यळी आलेल्या स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना आधीपासूनच असल्याचा आरोपही स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा तळेगाव दाभाडेच्या कचरा डेपोत टाकण्यामागे काही राजकीय कार्यकर्त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यांच्या कृपा आशिर्वादानेच पिंपरी चिंचवड शहरातील कचरा तळेगाव हद्दीत आणून टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे नेमके कोण आहेत, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या घटनेची माहिती नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे (पाटील), यांना देखील देण्यात आली .तळेगाव शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रयत्न करत असताना पिंपरी चिंचवड शहरातून कचरा आणून तळेगावात टाकण्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या प्रकरणी संबंधित ट्रक चालकांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या प्रकरणात फक्त चालकांवर कारवाई न करता ट्रक मालक व कचरा आणण्यामागील खरे सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तळेगाव शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून प्रशासनाने रात्रीच्या वेळी शहरात येणाऱ्या वाहनांवर अधिक कडक नजर ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण सत्य बाहेर आणणार का, असा सवालही आता शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *