लोणावळा नगरपरिषदेत खळबळ! मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी ठोकले टाळे
लोणावळा नगरपरिषदेत खळबळ! मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी ठोकले टाळे
लोणावळा :
लोणावळा नगरपरिषदेत प्रशासनातील ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू तसेच विषय समिती चे सभापती व नगरसेवकांनी २० मार्च रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे नगरपरिषदेत मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे हे वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी केला आहे. नागरिक विविध कामांसाठी वारंवार कार्यालयात येत असतानाही मुख्याधिकारी उपलब्ध नसतात, अशी तक्रार करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे कामकाज संध्याकाळी उशिरा, साधारण सात ते साडेसात वाजल्यानंतर सुरू होते, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दिवसभर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
या संदर्भात नगराध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र अनेक वेळा ते फोन उचलत नाहीत. नगराध्यक्षांचा फोनसुद्धा न उचलणे ही गंभीर बाब आहे. या वक्तव्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर येत आहे.
नगरसेवकांनीही यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. नगरपरिषदेत सत्ताधारी गटाकडे बहुमत असतानाही मुख्याधिकारी लोकप्रतिनिधींना सहकार्य करत नसतील, तर आपण खरोखर सत्तेत आहोत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर शहर विकासाच्या कामांवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे विकासकामे रखडत असल्याचा आरोप करत त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी केली आहे. या घटनेनंतर लोणावळा शहरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष वाढला असून, पुढील काळात या प्रश्नावर काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





