महत्त्वाचेराजकीय

इंदुरी-वराळे गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का निष्ठेला हरताळ, राजकारणाला धार – तालुका उपाध्यक्ष प्रशांत भागवत व मेघा भागवत यांचा राजीनामा


इंदुरी-वराळे गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का
निष्ठेला हरताळ, राजकारणाला धार – तालुका उपाध्यक्ष प्रशांत भागवतांचा राजीनामा

इंदुरी-वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय हादरा बसला असून पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत चंद्रकांत भागवत यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत उमेदवारीच्या राजकारणाने पेट घेतलेला असतानाच हा राजीनामा राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून प्रशांत भागवत यांनी जोरदार तयारी केली होती. गटागटात बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, लोकसंपर्क वाढवणे, सामाजिक उपक्रमांमधून उपस्थिती नोंदवणे असे सर्व स्तरांवर त्यांनी काम सुरू ठेवले होते. इंदुरी-वराळे गटासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा सुटल्याने त्यांच्या पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर होते. स्थानिक कार्यकर्त्यांचा पाठिंबा, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि सामाजिक स्वीकारार्हता या सगळ्या बाबी असूनही पक्षाने मेघाताई भागवत यांना उमेदवारी नाकारली आणि तेथूनच अस्वस्थतेचा उद्रेक झाला.

“आजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना झुकते माप देण्यात आले. हा केवळ आमचा नव्हे, तर प्रत्येक कष्टाळू कार्यकर्त्याचा अपमान आहे,” अशी थेट आणि जळजळीत प्रतिक्रिया देत प्रशांत भागवत यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यासोबतच त्यांनी स्वतः तसेच पत्नी सौ. मेघा प्रशांत भागवत यांनी पक्षातील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले.

प्रशांत भागवत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे झटून काम केले. आंदोलनं, निवडणुका, सामाजिक प्रश्न, स्थानिक विकासाचे मुद्दे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याने स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला मोठा तडा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर इंदुरी-वराळे गटातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली असून उमेदवारी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. “निष्ठा आणि कामाला किंमत नसेल तर पक्षात मेहनत कशासाठी?” असा सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. काही कार्यकर्त्यांनी थेट नेतृत्वावर टीकेची झोड उठवली असून आगामी निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसू शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, प्रशांत भागवत यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते कोणत्या पक्षात जाणार, स्वतंत्र भूमिका घेणार की नव्या राजकीय समीकरणांची मांडणी करणार, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, इंदुरी-वराळे गटात राष्ट्रवादी काँग्रेसला बसलेला हा धक्का केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटल्याशिवाय राहणार नाहीत. निष्ठेला डावलणाऱ्या राजकारणाचा हिशेब जनता आणि कार्यकर्ते दोघेही चोखपणे ठेवतील, हे मात्र नक्की.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *