सामाजिक

तळेगाव दाभाडेतील महामार्ग लगत अंधाराचा विळखा; हायमास्ट दिवा बंद, तातडीने दुरुस्त करण्याची मागणी


तळेगाव दाभाडेतील महामार्ग लगत अंधाराचा विळखा; हायमास्ट दिवा बंद, तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

तळेगाव दाभाडे: शहरातील पुणे–मुंबई महामार्गालगत जुडीओ समोरील परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेला हायमास्ट दिवा अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी धोकादायक बनला आहे. परिणामी, वाहनांच्या हेडलाईट्सवरच या मार्गावरील प्रकाश व्यवस्था अवलंबून राहिली आहे.

मुंबई–पुणे महामार्गावरून शहरात येण्या-जाण्यासाठी हा चौक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तसेच, येथे उभारलेला हायमास्ट पोल हा स्थानिकांसाठी एक ओळख चिन्ह (लँडमार्क) म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून हा दिवा बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दररोज हजारो वाहनांची ये-जा असलेल्या या मार्गावर अपुऱ्या प्रकाशामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. स्थानिक रहिवाशांनीही रात्रीच्या वेळी या परिसरातून प्रवास करणे टाळण्यास सुरुवात केली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे.

या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत अनेकदा संबंधित विभागाकडे लेखी तक्रारी व पत्रव्यवहार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे हायमास्ट दिव्याची दुरुस्ती करून पथदिवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, संभाव्य अपघातांची जबाबदारी प्रशासनावरच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

सदर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत असून, नागरिक आता प्रशासनाच्या कृतीकडे डोळे लावून बसले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *