स्वच्छता दूतांचा गौरव. पण घंटागाड्यांवर हिंदीचा गजर.तळेगावात राजभाषेच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर
स्वच्छता दूतांचा गौरव. पण घंटागाड्यांवर हिंदीचा गजर.तळेगावात राजभाषेच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर
तळेगाव दाभाडे : शहरात संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता दूतांचा कृतज्ञता गौरव सोहळा उत्साहात पार पडला. नगर परिषदेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसेंदिवस परिश्रम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र याच पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या एका वेगळ्याच प्रकारामुळे प्रशासनावर टीकेची झोड उठू लागली आहे.
शहरातील विविध भागांत सकाळच्या वेळी फिरणाऱ्या स्वच्छता विभागाच्या घंटागाड्यांवर हिंदी गाणी आणि घोषणा वाजवल्या जात असल्याने मराठीप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कचरे वाली गाड़ी आई.घर से कचरा निकाल . स्वच्छ भारत का इरादा कर लिया हमने अशा हिंदी घोषणा ध्वनिक्षेपकावरून दिल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा दर्जा दिलेला असताना सार्वजनिक सेवेत अशा प्रकारे हिंदीचा वापर होणे म्हणजे राजभाषेचा अवमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. हिंदी घोषणांच्या ऐवजी मराठीतून घोषणा द्याव्यात अशी मागणी मराठी प्रेमी नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नगराध्यक्षांनी नागरिकांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना कचरेवाले असे संबोधू नये, असे आवाहन केले होते. स्वच्छता दूतांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात घंटागाड्यांवरून हिंदी गाणी वाजवली जात असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एका बाजूला स्वच्छता दूतांचा गौरव आणि दुसऱ्या बाजूला राजभाषेबाबत दिसणारी उदासीनता, अशी विसंगती नागरिकांनी निदर्शनास आणली आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाकडून या प्रकाराबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, सामाजिक माध्यमांवर या विषयाने जोर धरला असून मराठी घोषणांचा तातडीने अवलंब करावा, अशी मागणी पुढे येत आहे. मराठी राज्यात मराठीच ऐकू यायला हवी. शासनाच्या राजभाषा धोरणालाच हरताळ फासणारा हा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
स्वच्छता मोहिमेचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये तफावत असल्याचाही आरोप काही नागरिकांनी केला आहे. शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच भाषेच्या सन्मानाचाही विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि संबंधित विभाग या प्रकरणी कोणती ठोस भूमिका घेतात आणि स्वच्छतेसोबत राजभाषेचा मान राखला जातो का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.





