ताज्या घडामोडीराजकीय

आमदार सुनील शेळके यांच्या एका डावाने भाजपच्या सभापती चा गेम झाला


आमदार सुनील शेळके यांच्या एका डावाने भाजपच्या सभापती चा गेम झाला

 

वडगाव : मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय पटावर अचानकच राजीनामा वादळ उसळत सत्तासमीकरणांचा खेळच पालटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उर्वरित चार संचालकांनीही अखेर आपले राजीनामे सादर करत आमदार सुनील शेळके यांच्या आदेशाला शिरोधार्य मानले. याआधीच नऊ संचालकांनी माघार घेतली होती. त्यामुळे एकूण तब्बल १३ संचालकांनी राजीनाम्यांची मालिका रचत समितीतील सत्ताकारणाला धक्का दिला आहे.

 

या घडामोडींमुळे भाजपने आखलेला सभापती पदाचा डाव अक्षरशः कोलमडला आहे. भाजपकडून सभापती पदग्रहणाची तयारी रंगात आली असतानाच आमदार सुनील शेळके यांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढत संपूर्ण समीकरण उलथवून टाकले. राजकीय वर्तुळात याला मास्टर स्ट्रोक म्हणून पाहिले जात आहे.

 

सभापती पदावर कब्जा मिळवण्याच्या भाजपच्या हालचालींना वेग आला असताना सुनिल शेळके यांनी आपल्या गटातील संचालकांना राजीनाम्याचा आदेश दिला. आदेश मिळताच संचालकांनी आपल्या पदांचा त्याग करत पक्षनिष्ठेचा प्रत्यय दिला. या सामूहिक निर्णयामुळे सभापती निवडीची संपूर्ण प्रक्रिया अधांतरी गेली आहे.

 

राजकीय तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय केवळ पदत्याग नसून आगामी राजकीय रणनितीचा भाग आहे. बाजार समितीतील सत्तासंतुलन बिघडवून नव्या समीकरणांना वाव देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मावळच्या राजकारणात आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

 

दरम्यान, भाजपच्या गोटात या घडामोडींमुळे अस्वस्थता पसरली असून हातात आलेले सभापतीपद निसटले अशी भावना कार्यकर्त्यांत व्यक्त होत आहे.सुनिल शेळके यांच्या या चालीमुळे पदग्रहणाआधीच पदाला ग्रहण’ लागल्याची चर्चा रंगली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *