मावळच्या रणांगणात भाजप-राष्ट्रवादी दुरावा ठळक महायुतीची स्वतंत्र चक्रव्यूह रचना
मावळच्या रणांगणात भाजप-राष्ट्रवादी दुरावा ठळक महायुतीची स्वतंत्र चक्रव्यूह रचना
मावळ : मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, भारतीय जनता पक्षाने मावळच्या राजकारणात नवा स्पष्टवक्ता सूर लावला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री बाळा भेगडे यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणतीही युती नसल्याचे ठामपणे जाहीर करून राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. “मावळमध्ये स्वबळावर आणि महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवली जाणार,” असे त्यांनी ठणकावून सांगत भाजपची रणनिती उघड केली.
भेगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मंगळवार, दिनांक २० जानेवारी रोजी महायुतीच्या वतीने उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार असून, ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हे तर विकासासाठी असल्याचा निर्धार पक्षाने केला आहे. “मावळ तालुक्यात भाजप संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आहे. कार्यकर्त्यांची ताकद, लोकांशी थेट संवाद आणि विकासकेंद्री अजेंडा या त्रिसूत्रीवर ही निवडणूक लढवली जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपचे राजकारण हे आरोप-प्रत्यारोपांच्या पलिकडे जाऊन विकास, पारदर्शकता आणि लोकहिताभिमुख निर्णयांवर आधारित असल्याचे सांगत भेगडे म्हणाले, “महायुतीच्या माध्यमातून स्वच्छ प्रतिमा असलेले, काम करण्याची क्षमता असलेले आणि जनतेशी नाळ जुळलेले उमेदवार मैदानात उतरवले जातील.” मावळच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य हे मुद्दे केंद्रस्थानी राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे, किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, माजी सभापती निवृत्ती शेटे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे, नगरसेवक चिराग खांडगे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाच्या ताकदीचे दर्शन घडवणारी ही उपस्थिती भाजपची संघटनात्मक घडी अधिक घट्ट असल्याचे सूचित करत होती.
यावेळी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रशांत भागवत यांचाही विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे संकेत देत भेगडे यांनी सांगितले की, इंदुरी-वराळे गटातून मेघनाताई भागवत या महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांना महायुतीकडून पूर्ण ताकदीने पाठिंबा दिला जाईल. “ही निवडणूक व्यक्तीची नाही तर विचारांची आहे,” असा संदेश यावेळी देण्यात आला.
पत्रकार परिषदेला भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मावळ तालुक्यात महायुती विकासाच्या मुद्द्यावर, एकसंधपणे आणि आत्मविश्वासाने उतरली असून, जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मावळच्या राजकीय रणभूमीत भाजपने आपली स्वतंत्र वाट ठसठशीतपणे अधोरेखित केल्याने निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.





