मावळ महसूल विभागावर भ्रष्टाचाराचे सावट; अतिरिक्त वसुलीने नागरिक हैराण
मावळ महसूल विभागावर भ्रष्टाचाराचे सावट; अतिरिक्त वसुलीने नागरिक हैराण
वडगाव (मावळ) : मावळ तालुक्यातील महसूल विभागाच्या कामकाजावर सध्या गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, नागरिकांना शासकीय शुल्क भरूनही अतिरिक्त रक्कम मोजावी लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर पुढे येत आहेत. जमिनीची मोजणी, सातबारा (7/12) उतारा, फेरफार नोंदणी तसेच मालकी हक्काचे दस्तऐवज अद्ययावत ठेवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
नियमांनुसार ठरलेले शुल्क भरूनही कामे वेळेत पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही प्रकरणांमध्ये महिनोनमहिने अर्ज प्रलंबित ठेवले जात असून, काम लवकर करून देतो या नावाखाली अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून जादा रकमेची मागणी केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सामान्य शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहेत.
जमिनीची मोजणी व हद्द निश्चिती ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून, त्यात होणारा विलंब अनेक वादांना कारणीभूत ठरत आहे. तसेच जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड यांसारख्या मूलभूत कागदपत्रांच्या वितरणातही अनावश्यक दिरंगाई होत असल्याची खंत व्यक्त होत आहे. सरकारी कार्यालयात कामासाठी धावपळ करावी लागते, पण त्यानंतरही अपेक्षित सेवा मिळत नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, नाणे मावळ, अंदर मावळ आणि पवन मावळ या भागांमध्ये अवैध उत्खननाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन सुरू असतानाही महसूल विभागाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. यामुळे पर्यावरणीय हानीसोबतच शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मावळमध्ये प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. नियमांप्रमाणे काम व्हावे, अतिरिक्त पैशांची मागणी थांबावी आणि अवैध प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
महसूल विभागाने या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पारदर्शक व जबाबदार प्रशासन उभे करणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा नागरिकांचा शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.





