उद्योग

मावळच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत नावाला अधिकृत मान्यता


मावळच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत’ नावाला अधिकृत मान्यता

मावळ :
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात औद्योगिक विकासाला गती देणारी इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत आता ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्यादित, मावळ’ या नव्या नावाने ओळखली जाणार आहे. मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, मावळभूषण माजी आमदार स्व. कृष्णरावजी भेगडे यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आकाराला आलेल्या या वसाहतीच्या नामकरणास सहकार विभागाने अधिकृत मंजुरी देत कागदोपत्री शिक्कामोर्तब केले आहे.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक परिसरात वसलेली ही सहकारी औद्योगिक वसाहत उद्योजकांसाठी विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे. लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांना एकत्र आणत उद्योजकांना जागा, पाणीपुरवठा, वीज तसेच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. सध्या वसाहतीमध्ये एकूण १९ कारखाने कार्यरत असून येत्या काळात अनेक नवीन उद्योग येथे दाखल होणार आहेत. यामुळे मावळ परिसरात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेच्या ११व्या वर्षातील दुसऱ्या दिवशी, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी नामफलकाचे प्रातिनिधीक अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ उद्योगपती व कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुणजी फिरोदिया, मालपाणी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मा. संजयजी मालपाणी तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली. सध्या अध्यक्षपदाची जबाबदारी नंदकुमार शेलार सांभाळत असून कार्यकारिणी सदस्य म्हणून गणेश खांडगे.राजश्री म्हस्के .सचिन ढोरे.अरूण वाघमारे हे कार्यरत आहेत.

या नामकरणासंदर्भात तसेच संस्थेच्या भावी विकास योजनांची माहिती देण्यासाठी दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वडगाव मावळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते. मावळच्या औद्योगिक, आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी ही वसाहत भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *