गावागावांत डॉक्टर साहेबां भोवती विश्वासाची लाट टाकवे बुद्रुक–नाणे गटात डॉ. अशोक दाते यांचा जनसंवाद दौरा वादळासारखा
गावागावांत डॉक्टर साहेबां भोवती विश्वासाची लाट
टाकवे बुद्रुक–नाणे गटात डॉ. अशोक दाते यांचा जनसंवाद दौरा वादळासारखा
टाकवे बुद्रुक :
मावळ तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत टाकवे बुद्रुक–नाणे जिल्हा परिषद गटात आता एकच चर्चा सुरू आहे यावेळी डॉक्टरच हवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. अशोक विठ्ठल दाते यांचा गावागावांत सुरू असलेला जनसंवाद दौरा सध्या राजकीय समीकरणे बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. शनिवारी (दि. ३१) आंदर मावळ विभागात पार पडलेल्या दौऱ्याने विरोधकांची झोप उडवली असून, सर्वसामान्य मतदारांमध्ये आशेची नवी पालवी फुटली आहे.
ढोल-ताशांचा गजर, फुलांचा वर्षाव आणि डॉ अशोक दाते आगे बढो अशा घोषणा देत ग्रामस्थांनी या दौऱ्याचे स्वागत केले. फळणे, दवणेवाडी, माऊ, मोरमारवाडी, गभालेवाडी, डोंगरवाडी, सटवाईवाडी, वडेश्वर, लष्करवाडी, शिंदे–घाटेवाडी, नागाथली, वहानगाव, कुसवली, कांब्रे, बोरवली, डाहुली, चिरेखाणी, रढेवाडी, कुसूर, खांडी, गोंटेवाडी, आढारवाडी, ढोंगेवाडी, मेठलवाडी, सावळा गावठाण, माळेगाव बुद्रुक, तळपेवाडी, पिंपरी, माळेगाव खुर्द, कुणेवाडी, कुणे अनसुटे, पारिठेवाडी, इंगळून, किवळे–पिचडवाडी, कशाळ आदी गावांमध्ये हा दौरा अक्षरशः वादळासारखा फिरला.
या दौऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भाषणबाजीपेक्षा थेट संवाद. डॉ. दाते प्रत्येक गावात लोकांच्या दारात गेले, त्यांच्या व्यथा ऐकल्या, पाणीटंचाईपासून आरोग्याच्या प्रश्नांपर्यंत, रस्त्यांपासून रोजगारापर्यंत सगळ्या समस्या शांतपणे समजून घेतल्या. निवडणूक आली की दिसणारे नेते नकोत, संकटात धावून येणारा माणूस हवा.अशी भावना अनेक ग्रामस्थांनी उघडपणे व्यक्त केली.
सर्वसामान्य आदिवासी कुटुंबात जन्मलेले डॉ. अशोक दाते म्हणजे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. परिस्थिती प्रतिकूल, साधनसामग्री अपुरी, तरीही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर झाल्यावरही त्यांनी स्वतःपुरते आयुष्य न जगता समाजासाठी झटण्याचा मार्ग निवडला. मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, गरजू रुग्णांना मदत, आरोग्य जनजागृती, सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून त्यांनी सेवेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
राजकारणात उतरताना त्यांनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही, पण मी तुमच्यातलाच आहे.ही भावना त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसते. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि कामाची शिस्त ही त्यांची ओळख बनली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेत सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास साधण्याचा त्यांचा निर्धार आहे.
आरोग्य सुविधांचा विस्तार, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या संधी, युवकांसाठी रोजगारनिर्मिती आणि गावागावातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, हा त्यांचा विकासाचा अजेंडा आहे. राजकारण सत्तेसाठी नाही, सेवेचे साधन असावे हा विचार घेऊन ते मतदारांमध्ये पोहोचत आहेत.
टाकवे बुद्रुक–नाणे गटात सध्या चित्र स्पष्ट होत चालले आहे. उच्चशिक्षित, संवेदनशील आणि काम करणारा प्रतिनिधी मिळावा, अशी मतदारांची अपेक्षा आहे. यावेळी प्रयोग नाही, अनुभव आणि प्रामाणिकपणा हवा.असा सूर गावोगावी ऐकू येत आहे. त्यामुळेच डॉ. अशोक विठ्ठल दाते यांच्या उमेदवारीभोवती विश्वासाची लाट निर्माण झाली असून, निवडणुकीच्या रणांगणात त्यांची वाटचाल अधिक भक्कम होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.





