ताज्या घडामोडी

पाटणमध्ये दरड कोसळून शेतकरी दांपत्यासह मुलाचा मृत्यू: मावळ हादरला


पाटणमध्ये दरड कोसळून शेतकरी दांपत्यासह मुलाचा मृत्यू: मावळ हादरला

पाटण (मावळ) : मावळ तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी पहाटे भीषण दुर्घटनेला निमंत्रण दिले. पाटण गावातील एका घरावर दरड कोसळल्याने शेतकरी नंदकुमार दत्तू तिकोणे, त्यांच्या पत्नी अनिता तिकोणे आणि मुलगा ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तिकोणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून तो थेट तिकोणे कुटुंबाच्या घरावर कोसळला. माती, दगड आणि झाडांच्या ढिगाऱ्याखाली घर पूर्णपणे दबले गेले. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, महसूल प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अनेक तासांच्या शोध व बचाव मोहिमेनंतर ढिगाऱ्याखालून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचा मृत्यू झाल्याने पाटण गावावर शोककळा पसरली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत तिकोणे कुटुंबाला अश्रुपूर्ण निरोप दिला.

नंदकुमार तिकोणे हे परिसरातील कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या या कुटुंबावर काळाने अचानक घाला घातला. विशेष म्हणजे, मुलगा ज्ञानेश्वरचा विवाह अवघ्या वर्षभरापूर्वीच झाला होता. नव्या आयुष्याची स्वप्ने साकार होण्यापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील अनेक दरडप्रवण भाग धोक्याच्या छायेत आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या दुर्घटनेने नैसर्गिक आपत्तींसमोर ग्रामीण भागातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *